Ahmednagar Politics : खा. निलेश लंके हे मागील वर्षभरापासून राजकीय वर्तुळात चर्चेचे विषय राहिले. त्यात त्यांनी अहमदनगर लोकसभेची जागा मारली त्यानंतर मात्र त्यांचे यश द्विगुणित झाले.
दरम्यान आज ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांनी पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेट घेत सत्कार स्वीकारला. दरम्यान त्यांच्यावर टीकेची झोड उठताच त्यांनी मात्र आता यावर स्पष्टीकरण दिले आहे.
ही अपघाताने झाली, मला ते कोण आहेत हे माहिती नव्हते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
खा.लंकेंची सारवासारव
खा.निलेश लंके म्हणाले आहेत की, ती सन्माननीय व्यक्ती कोण आहे याची मला कल्पना नव्हती. आपण समाजकार्यात काम करणारी माणसं. कोणीही गाडीला हात केला की थांबतो. काल त्यांच्या घरासमोरून जात असताना त्यांनी हात केला.
मी थांबलो. त्यांनी चहा प्यायला चला म्हणून सांगितले. आम्ही चहा घेतला. त्यांनी माझा सत्कारही केला. तोपर्यंत मला समोरील सन्माननीय व्यक्ती कोण, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे माहिती नव्हते. आज सकाळी मला कळाले की काल ज्यांना आपण भेटलो ते
अशा अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती. मला आधी माहिती असते तर मी तेथे गेलो नसतो. ही घटना अपघाताने घडली. तरीही ती चूकच म्हणावी लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नेमके काय घडले होते
अहमदनगर लोकसभा मतदार संघामधून निवडून आलेले खासदार निलेश लंके हे कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर आली होती. धक्कादायक म्हणजे त्यांनी यावेळी त्यांच्याकडून सत्कारही स्वीकारला.
त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले असून खा. लंके हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली व त्यावेळी त्यांच्यावरही टीकास्त्र सोडले गेले होते.