राजकारण

आ. राजळेंच अवघडच ? भाजपमधूनच बंड, मुंडेही विरोधात गेले..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. विविध मतदारसंघात दिग्गज तयारीला लागलेत. पाथर्डी शेवगाव मध्ये मोनिका राजळे या स्टँडिंग आमदार असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल असे म्हटले जात आहे.

परंतु निवडणुकीआधीच भाजपमध्येच बंड पाहायला मिळत आहे. विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे विधानसभेची उमेदवारी मिळावी, असा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केला असून,

यासंदर्भात शेवगाव येथे दि.२४ ऑगस्ट रोजी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजप कार्यकत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याने भाजपच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मंगळवारी शेवगाव येथे शेवगाव तालुक्यातील भाजप व मित्रपक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या मतदारसंघात मोनिका राजळे या भाजपच्या विद्यमान आमदार असून, त्यांच्या विरोधात मुंडे यांनी उघडपणे दंड थोपटले आहेत,

त्यामुळे पक्षश्रेष्ठी यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे मतदारसंघातील राजकीय चाणक्यांचे लक्ष लागले आहे. आ. राजळे या गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीपासून म्हणजे सुमारे दहा वर्षापासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

श्रेष्ठींनी भाकरी फिरवावी व शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून अरुण मुंडे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी नियोजनाच्या बैठकीत उपस्थित भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली. बैठकीस भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर,

शिवसंग्रामचे नवनाथ इसरवाडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन शेळके यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांनी केले आहे.

दरम्यान दुसरीकडे भारतीय जनता पक्षात गेल्या वीस वर्षांपासून एकनिष्ठ राहून काम केले आहे. आता सामान्य माणसांचा प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे, यासाठी काम करीत आहोत. शेवगाव येथे (दि. २४) ऑगस्ट रोजी होणाऱ्या निष्ठावंत व भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यास उपस्थित रहा,

आमची भूमिका स्पष्ट करू असे आवाहन भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळभाऊ दौंड यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office