Ahmednagar Politics : एकीकडे प्रशासनावर कुठलाही अंकुश नाही. कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत तर दुसरीकडे विकास कामांच्या नावाखाली गरज नसलेली व तांत्रिकदृष्ट्या अपयशी ठरणारी कामे जनतेच्या माथी मारण्यात येत आहेत, अशा बेजबाबदार कार्यपद्धतीमधून स्वतःला मिरवून घेण्याचे उद्योग सध्या मतदारसंघात चालू असल्याची टीका मा. आ. चंद्रशेखर घुले यांनी आ. मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळून केली.
तालुक्यातील माणिकदौंडी, आल्हडवाडी, पटेल वाडा, घुमटवाडी, चेकेवाडी आदी गावांमध्ये माजी आमदार घुले यांनी परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून परिसरातील जनतेशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी आलमगीर पठाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते बाळासाहेब ताठे, सरपंच शाहिद पठाण, मच्छिद्र गव्हाणे,
संजय चितळे, रामेश्वर कर्डिले, भाऊसाहेब कर्डिले, उत्तम पवार, अश्फाक पठाण, अजिज पठाण, रवींद्र घोषीर, अश्पाक पठाण, सुनील पवार, कडूबाळ लोंढे, एजाज पठाण, शेखर भापकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना घुले म्हणाले की, मतदारसंघातील लोकांनी मला एकदा संधी दिली तर पन्नास वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावली.
माणिकदोंडी येथील विद्युत उपकेंद्र करून दुर्गम परिसरातील वाडी, वस्ती व तांड्यापर्यंत वीज आणली. पटेल वाडा तलावाची गळती पूर्णपणे थांबवून व उंची वाढवून पाण्याची साठवण क्षमता वाढवली. दरी डोंगरात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. माझ्या पाच वर्षाच्या तुलनेत मागील दहा वर्षात झालेली कामे पाहिली तर आपणाला मोठा फरक दिसून येईल.
मी केलेल्या कामांमुळे नागरिकांना आजही मूलभूत सुविधा मिळत आहेत. तर आताच्या लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचाराचे कुरण निर्माण करुन निकृष्ट कामाच्या माध्यमातून ठेकेदार पोसण्याचे काम चालवले आहे. प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही. यामुळे जनतेला कोणीही वाली नाही, अशी परिस्थिती आहे.
आगामी निवडणुकीत पुन्हा संधी दिल्यास विकास कामांचा अनुशेष भरून काढू, असे घुले म्हणाले. दरम्यान विविध गावांतील पदाधिकाऱ्यांनी आ. राजळे यांच्या विषयी नाराजी व्यक्त करत घुले यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याचा आग्रह केला.
लोकप्रतिनिधींचे आमच्याकडे दुर्लक्ष
अनावश्यक व चुकीच्या अनेक कामांबद्दल अनेकदा लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यांनी आमच्या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केले. पाझर तलावाची मागणी केलेली असताना गरज व आवश्यकता नसलेली कामे मंजूर करण्यात येत आहेत.
याचे गौडबंगाल अजूनही आम्हाला उमजत नाही. यामुळे गावाची प्रगती थांबुन अधोगतीच होत आहे. यामुळे गावाच्या विकासासाठी आगामी काळात घुले यांना साथ देऊ.: मच्छिद्र गव्हाणे माजी सरपंच आल्हाणवाडी