Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याने आता आघाडीकडून आमदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे.
विशेष असे की, या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, सर्वच पक्षातील काही हौशी इच्छुक अन् काही आमदारांचे कार्यकर्ते आपल्याच साहेबांनाच कशी मतदारांची पसंती आहे, हे दाखवून देण्याचे काम ऑनलाइन एक्झिट पोलच्या माध्यमातून करीत आहेत.
महाविकास आघाडीत संभ्रम
उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी श्रीगोंदा तालुक्यात विधासभेच्या जागा लढविण्यावरुन केलेल्या वक्तव्याने खुद्द ठाकरे गटाचे शिवसैनिक यासोबतच उर्वरित दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत.
श्रीगोंदा आणि पारनेर येथील उमेदवारांची आघाडीत कोणतीही चर्चा झाली नसताना राऊत यांनी नावे जाहीर केल्याचा तो परीणाम होता. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत जिल्ह्यातील सात जागांवर काँग्रेस पक्षाने दावा केला.
तर जेष्ठ नेते खा. शरद पवार यांनी अकोल्यात येवून अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे सुतोवाच केल्याने जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच आघाडीत मात्र नेत्यांच्या दाव्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सात जागांचा दावा केल्याने यावर आघाडीत कसे एकमत होणार असा प्रश्न निर्माण होणार आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या विजयामुळे काँग्रेससह राष्ट्रवादी (शरद पवार) गट,
शिवसेना ‘उबाठा’ गटाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. यामुळे आघाडीकडून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या वाढतच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षात वाढलेली इच्छुकांची संख्या चांगलीच डोकेदुखी ठरणार असल्याचे वास्तव सध्या दिसत आहे.