राजकारण

Ahmednagar Politics : त्यांना तात्पुरता ‘असुरी’ आनंद घेऊ द्या; मुख्यमंत्री शिंदे यांची टीका

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : ‘विखे कुटुंबाला सहकाराची मोठी परंपरा आहे. त्यांना तात्पुरता आणि असुरी आनंद घेऊ द्या. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. त्यामुळे सुजय तुम्ही नाराज होऊ नका आपण लढणारे आहोत पुन्हा लढू आणि जिंकू’.असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी सुजय विखे यांना दिलासा दिला आहे.

सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ लोणी येथे शिक्षक आणि संस्थाचालकांच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना होत आला तरी नीलेश लंके आणि सुजय विखे यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीत चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा एक होता. सुजय विखे यांना पराभव जास्त जिव्हारी लागला असल्याचं बोललं जात आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुजय विखे यांना धीर दिला.

शिंदे पुढे म्हणाले की, ”लोकसभेच्या निवडणुकीतून आपल्याला बोध घेण्याची वेळ आली आहे. आपल्याबाबत गैरसमज पसरवण्यात आला. आणि तो लोकांच्या मनातून काढून टाकण्यात अपयशी ठरलो. मोदी द्वेशाने पछाडलेले सर्वजण एकवटले होते. तरी सुद्धा मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले. झालं गेले त्याच्या मागे आता जायचे नाही.

आपण लढणारे आहोत रडणारे नाही. पुन्हा लढू पुन्हा जिंकू, नाराज होवू नका. महाविकास आघाडीने कसा प्रचार केला या खोलात आता जायचे नाही. माझ्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांना विखे पाटील जास्त जवळून ओळखतात, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यावेळी त्यावेळी दराडे यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न मांडले. यात जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण संस्थांना सातव्या आयोगाप्रमाणे अनुदान द्या, आश्रमशाळांची वेळ बदला या मागण्या आमदार किशोर दराडे यांनी भाषणात केल्या. ‘तुम्ही आमचे दाते आहात. शिक्षकांच्या मागण्या या अधिवेशनात मंजूर करा. अशी मागणी केली.

Ahmednagarlive24 Office