अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- प्रतीक बाळासाहेब काळे या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची चौकशी करावी, अशी मागणी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी संजय सुखदान यांना मंत्री गडाख त्रास देत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी माजी आमदार मुरकुटे यांनी गडाख कुटुंबावर आरोप केले. प्रतीक काळे याच्या आत्महत्या प्रकरणी पोलिस दबावात आहेत, आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीकने व्हाट्सएप मेसेज, ऑडिओ व्हिडीओ क्लिपमध्ये गडाख कुटुंबीयांची नावे घेतली आहेत.
त्यामुळे या प्रकरणी शंकरराव गडाख यांची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा राजीनामा घ्यावा, असे ते म्हणाले.
गडाख यांच्या दबावात न येता कार्यवाही करून चौकशी करावी, अशी मागणीही मुरकुटे यांनी केली. पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
मंत्री गडाख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे, उत्तर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, जिल्हा महासचिव योगेश साठे,
सुरेश कोडलकर, मनोज साळवे, प्रवीण आल्हाट, फिरोज पठाण, संजय जगताप, गौतम पगारे, अमर निरभवणे, डॉ. जालिंदर घिगे, सुमित मकासरे, महेश पाखरे सहभागी झाले होते.