Ahmednagar Politics : पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी व गटनोंदणीत राष्ट्रवादीबरोबर असणारे भाजपचे नगरसेवक अशोक चेडे विरोधी गटात दाखल झाले आहेत.
त्यामुळे आमदार नीलेश लंके यांना धक्का बसला आहे. मात्र, आमदार नीलेश लंके यांनी सेनेचे नगरसेवक जवळ करीत १० नगरसेवक सहलीवर पाठवले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितीन आडसूळ व सेनेतून विखे गटात गेलेले युवराज पठारे यांच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी लढत होत आहे.
५ जुलैला मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष विजय औटी यांचा सव्वावर्षाचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी मागील आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यास मुदत होती.
राष्ट्रवादीकडून नितीन आडसूळ व डॉ. विद्या कावरे इच्छुक होते. मात्र, सर्वसाधारण जागा असल्याने डॉ. विद्या कावरे यांनी आपण थांबण्यास तयार असल्याचे सांगितले. आमदार नीलेश लंके व नगरसेवक यांनी नितीन आडसूळ यांची उमेदवारी निश्चित केली. त्यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आता मतदानाच्या दिवसाकडे लक्ष लागले आहे.
विजय औटी, अशोक चेडे भाजपच्या गटात
राष्ट्रवादीकडून नितीन आडसूळ यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, भाजपचे अशोक चेडे हे विरोधी गटात दाखल झाले. विखे गटाचे नगरसेवक युवराज पठारे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी ऑटी, चेडे त्यांच्याबरोबर उपस्थित होते. यामुळे विखे गटाने आमदार नीलेश लंके यांना धक्का दिला.
लंके यांनी जुळविले गणित
विखे गटाकडून धक्का तंत्र अवलंबले जात असल्याचे लक्षात येताच आमदार नीलेश लंके यांनी शिवसेनेच्या काही नगरसेवकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीचे नगरसेवक सहलीला पाठवले आहेत. नगराध्यक्षपदासाठी आमदार लंके यांनी संख्याबळ जुळविले असल्याचे समजते.