राजकारण

Ahmednagar Politics : आमदार रोहित पवार यांनी उपोषण केले स्थगित ! अखेर ‘तो’ निर्णय आला…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : येत्या पावसाळी अधिवेशनात कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढून इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचे लेखी पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी याप्रश्नी दि. ३ जुलै रोजी मंत्रालयात करण्यात येणारे उपोषण तूर्तास स्थगित करण्यात केले आहे.

कर्जत – जामखेड मतदारसंघात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी आ. पवार हे निकराचे प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून एमआयडीसी स्थापन करण्यास त्यांनी मान्यता मिळवली. मात्र, पुढील प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच राज्यात सत्ताबदल झाला,

त्यामुळे एमआयडीसीची अधिसूचना काढून इतर अनुषंगिक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची प्रक्रिया रखडली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आ. पवार हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. गेल्या हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अशा दोन्हीही अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर दोन्ही अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावून तेथे सरकारच्या मध्यस्थीने उद्योग आणले जातील, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, त्यामुळे आ. पवार यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांची अनेकदा भेट घेऊन एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

परंतु राजकीय आकसापोटी मतदारसंघातील काही लोकांकडून एमआयडीसीच्या प्रश्नाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावला जात नसल्याचा आ. पवार यांचा आरोप आहे. दरम्यान, एमआयडीसीचा विषय मार्गी लावण्यासाठी आ. पवार ज्यांनी अखेर दोन महिन्यांपूर्वी सरकारला निर्वाणीचा उशारा देत थेट उपोषणाचे हत्यार उपसले आणि तसे पत्र सरकारला दिले.

त्यानुसार सोमवार, ता. ३ जुलै रोजी मतदारसंघातील नागरिक आणि तरुणांसोबत त्यांचे नियोजित उपोषण होते. परंतु तत्पूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आ. पवार यांना पत्र देऊन येत्या अधिवेशनात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे आ. पवार यांनी त्यांचे पूर्वनियोजित उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.

मतदारसंघातील ‘एमआयडीसी’ साठी गेल्या चार वर्षांपासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु केवळ याचे श्रेय मला मिळू नये म्हणून मतदारसंघातील काही झारीतील शुक्राचार्य राजकीय दबावतंत्राचा वापर करत अडथळा आणत आहेत,

पण यामुळे मतदारसंघाचे आणि येथील तरुणांचे किती नुकसान होते, याची जाणीव त्यांना नसावी याचं आश्चर्य वाटतं. पण आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या पत्रानुसार उपोषण तूर्तास स्थगित करत आहे. मात्र, कोणत्या तारखेपर्यंत हा प्रश्न मार्गी लावला जाईल, याचं तपशीलवार पत्र देण्याची मागणीही उद्योगमंत्र्यांकडे केली आहे. आ. रोहित पवार, कर्जत-जामखेड

Ahmednagarlive24 Office