Ahmednagar Politic : मुस्लिम समाजाकडून माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देण्यात आले. मुस्लिम समाजाच्या मागण्या आ. तनपूरे यांनी विधानसभेत मांडून ठोस निर्णयासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती संदर्भातील मागण्या आमदार प्राजक्त तनपूरे यांनी विधानसभेत मांडाव्या तसेच ठोस निर्णयासाठी प्रयत्न करावेत. यासाठी राहुरी तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने आमदार प्राजक्त तनपूरे यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मुस्लिम समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती या संदर्भात ९ मार्च २००५ रोजी माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी सेवानिवृत्त न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली गेली होती. या समितीने आपला रिपोर्ट ३० नोव्हेंबर २००६ रोजी भारतीय संसदेमध्ये प्रस्तुत केला होता.
एकूण ७६ ठरावांपैकी ७२ ठराव मंजूर केले गेले होते. ज्यामध्ये मुस्लिमांची परिस्थिती बिकट असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले गेले होते. परंतु नंतरच्या काळात मुस्लिमांची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती खालावत गेली. परंतु ७२ ठरावांपैकी एकाचीही अंमलबजावणी केली गेलेली नाही.
येत्या २६ जून पासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजुर झालेले अल्पसंख्याक विकास कार्यालय व राज्यासाठी मंजुर झालेले अल्पसंख्याक आयुक्तालय तातडीने कार्यान्वित करणे. बारर्टी, सारथी, महाज्योतीच्या धर्तीवर अल्पसंख्यांक समाजासाठी मार्टी किमान ५०० कोटी बजेटसह मंजुर करणे, अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचे बजेट किमान ५ हजार कोटी मंजुर करणे,
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज योजनेप्रमाणे मौलाना आझाद महामंडळाचे शैक्षणिक व व्यवसाय कर्ज योजनासाठी व्याज परतावा योजना मंजुर करणे, यासाठी दरवर्षी फक्त १५ कोटी रक्कम मंजुर करणे, मौलाना आझाद महामंडळासाठी ५०० कोटी भांडवल मंजुर ही घोषणा झाली पण महामंडळाला वास्तवात किती रकम मिळाली, याचा तपशील जाहीर करणे,
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिमांबद्दल तिरस्कार निर्माण करणारी पेजेस, फेसबुक अकाऊंट्स अनेक फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केली जात आहेत. हे सर्व रोखण्यासाठी मुस्लिम संरक्षण कायदा करण्यात यावा, आदी मागण्या आमदार तनपूरे यांनी विधानसभेत मांडाव्या, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर इम्रान देशमुख, सोयल खान, रियाज शेख, आसिफ शेख, साबीर शेख, समिर शेख, इरफान शेख, अशफाक शेख आदींच्या सह्या आहेत.