Ahmednagar Politics News : सहकार, कृषी, क्रीडा, उद्योग, पर्यटन, शिक्षण, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याने आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. आता जिल्ह्यालाही एक वेगळी ओळख मिळाली आहे. अहमदनगर आता अहिल्यानगर बनले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अहमदनगरचे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात लढत होणार आहे.
नेहमीप्रमाणेच याही निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. येथील 18 व्या लोकसभेची निवडणूक विशेष रंगतदार होणार अशी आशा आहे. पण, तुम्हाला दिल्लीच्या संसदेत नगर दक्षिणमधून खासदार म्हणून पहिल्यांदा कोणाची वर्णी लागली होती? नगरचे पहिले खासदार कोण होते याबाबत माहिती आहे का? नाही ना, मग आज आपण याच बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोण होते अहमदनगरचे पहिले खासदार
उत्तमचंद रामचंद बोगावत हे अहमदनगरचे पहिले खासदार. 1952 च्या निवडणुकीत बोगावत यांनी विक्रमी मताधिक्य मिळवत पहिल्यांदा दिल्लीच्या संसदेत नगरचे प्रतिनिधित्व केले. लोक त्यांना प्रेमाने भाऊसाहेब म्हणत. बोगावत यांची आर्थिक परिस्थिती मात्र जेमतेम होती. बोगावत कुस्ती खेळत आणि यातून फेटे जिंकून त्या फेट्यांची विक्री करून ते त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवत.
सुरुवातीचे शिक्षण त्यांनी अशाच तऱ्हेने पूर्ण केले. यानंतर बोगावत नगरला आलेत. नगरला आल्यानंतर भाऊसाहेब फिरोदिया यांच्या घरी त्यांनी वास्तव्य केले. पुढे त्यांनी मुंबईला जाऊन वकिलीचे शिक्षण घेतले. पुढे ते नगर नगरपालिकेत नगरसेवक झालेत. 1946-47 मध्ये ते नगराध्यक्ष देखील राहिलेत.
बोगावत यांनी त्यांच्या कार्यकाळात पिंपळगाव मालवी येथील तलावाचे काम पूर्ण केले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्थातच 1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उत्तमचंद रामचंद बोगावत यांना तिकीट दिले. त्यावेळी कामगार किसान पक्षाचे भाई सथ्था आणि बोगावत यांच्यात लढत झाली.
या निवडणुकीत बोगावत 21 हजार 600 मतांनी विजयी झालेत. विशेष म्हणजे नगरचा हा पहिला खासदार सायकलने संसदेत जात. संसदेत सायकल वरून जाणारे, अहमदनगर दक्षिण लोकसभाचे प्रतिनिधित्व करणारे बोगावत यांनी संसदेत अनेक मुद्दे उपस्थित केलेत. त्यांनी गावोगावी टपालच्या शाखा सुरू झाल्या पाहिजेत यासाठी संसदेत पहिल्यांदा मागणी उपस्थित केली आणि ही मागणी पूर्ण देखील झाली.
संसद सदस्यांच्या निवृत्तीवेतनाचा मुद्दा देखील त्यांनी संसदेत मांडला. 1952 च्या दुष्काळात देखील त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय ठरले होते. खरे तर 1952 च्या दुष्काळाची झळ संपूर्ण जिल्ह्याला बसली होती मात्र जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या परिसरात दुष्काळाची झळ, उन्हाची काहिली काहीशी अधिक पाहायला मिळाली होती. त्यावेळी या परिसरात अन्नधान्याचा तुटवडा जाणवत होता.
लोकांना खाण्यासाठी देखील अन्न नव्हते अशी विदारक परिस्थिती होती. यामुळे बोगावत खूपच व्याकुळ होते. दरम्यान त्याकाळी त्यांनी संसदेत या परिसरातील दुष्काळाची दाहकता मोठ्या तळमळीने मांडली. त्यांची तळमळ पाहून स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. नेहरू यांचा दौरा संपन्न झाल्यानंतर तात्काळ या परिसरातील नागरिकांसाठी मदत पोचवली गेली.
नेहरू यांनी दुष्काळी उपाययोजनांबाबत संबंधितांना आदेश निर्गमित केलेत. त्याच भीषण दुष्काळात बोगावत यांनी लोकांना अन्नधान्याची कमतरता भासत असल्याने सरकारी गोदाम फोडले. लोकांसाठी सरकारी गोदामातून त्यांनी अन्नधान्य उपलब्ध करून दिले. मात्र याच प्रकरणात पुढे त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना अटक देखील करण्यात आली. त्यावेळी बोगावत यांनी जिल्ह्याच्या पाणी प्रश्नांवरून संसदेत मोठा लढा दिला.
मुळा व कुकडी धरणाचे जिव्हाळ्याचे विषय त्यांनी संसदेत मांडलेत. एकंदरीत नगरच्या पहिल्या खासदारांनी नगरसाठी खूपच उल्लेखनीय काम केले. मात्र संसदेत सायकल वरून जाणाऱ्या या नगरच्या पहिल्या खासदाराची, ज्यांनी दुष्काळात येथील लोकांसाठी सरकारी गोदाम फोडत तुरुंगवास भोगला त्या खासदाराची कोनशिला कुठे आढळत नाही. अलीकडे रस्ते, पूल, स्टेडियम इत्यादीला नेत्यांची नावे दिली जातात. मात्र नगर दक्षिणच्या पहिल्या खासदाराचे कार्य वाखाण्याजोगे असतानाही त्यांची साधी कोनशीला देखील पाहायला मिळतं नाही.