Ahmednagar Politics : शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न अनेक दिवसांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. खरे तर शिक्षक हे समाज निर्मितीचे महत्वाचे काम करतात. त्यांच्या प्रती शासनाने असा संकुचित दृष्टिकोन ठेवणे चुकीचे आहे.
देशाच्या विकासात आणि जडणघडणीत सर्वाधिक योगदान शिक्षण क्षेत्र देत असताना असा अन्यायकारक निर्णय लादला गेल्याने नव्या शिक्षकांमध्ये मोठा रोष आहे. त्याविरोधात लढा सुरूअसला तरी ठोस निर्णय मात्र होऊ शकला नाही.
शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मला संधी दिली तर जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न मीच मार्गी लावणार असा निर्धार व्यक्त करत हा प्रश्न माझ्याकडून सुटला नाही तर पुन्हा मते मागण्यासाठी येणार नाही. अशी प्रतिज्ञा नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केली आहे.
शिक्षकांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत, त्यांचा विचार करून त्यांची पुर्तता कशी करता येईल याचे धोरणात्मक आश्वासनही आपण दिल्याचे विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले. तसेच नाशिक शिक्षक मतदार संघातून शिक्षक तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहोत.
आपण विवेकनामा प्रसिध्द केला असून तो सर्वसमावेशक असा असल्याच्या प्रतिक्रीया सर्वसामान्य शिक्षक मतदार देत असल्याचे देखील ते म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून शासन दरबारी जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नाकडे संबंधितांनी लक्ष न दिल्याने त्याविषयी या निवडणूकीच्या दरम्यान सार्वत्रीक चर्चा होताना दिसत आहे.
जुन्या पेन्शन योजनेचा विषय हा नव्याने दाखल झालेल्या शिक्षकांसाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गीच लागला पाहिजे ही भूमिका घेत विवेक कोल्हे या निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून हा प्रश्न मीच मार्गी लावणार, अन्यथा पुन्हा मते मागण्यासाठी येणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे.
राज्यात, केंद्रात कोणाचेही सरकार असो मी अपक्ष म्हणून उमेदवारी करत असल्याने कोणत्याही पक्षाविरोधात या निर्णयासाठी मी ठामपणे लढा देईल अशी ग्वाही कोल्हे यांनी विवेकनाम्यात दिली आहे.