Ahmednagar Politics : लोकसभेला भाजपसह महायुतीमधील अनेक नेत्यांना पराभव पत्करावा लागला. पराभूत खासदारांनी पराभवाची अनेक करणीमिमांसा केल्या. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी मात्र आपल्या पराभवाचे खापर आता अयोध्येतील राम मंदिरावर फोडले आहे.
लोकसभेला राम मंदिर हाच मुद्दा भाजपला , महायुतीला तारेल असे चर्चिले जात होते. दरम्यान आता याच्या विरोधातच महायुतीचेच माजी खा. लोखंडे यांनी वक्तव्य केले आहे. अयोध्यामध्ये जे राम मंदिर बांधले गेले हे देखील माझ्या पराभवाचे एक कारण आहे असे ते म्हणाले.
काय म्हणाले माजी खा. लोखंडे?
अयोध्यामध्ये जे राम मंदिर बांधले गेले हे देखील माझ्या पराभवाचे एक कारण आहे असे ते म्हणाले. हे स्पष्ट करताना याचे विश्लेषण देखील त्यांनी केले. ते म्हणाले, शिर्डी मतदारसंघामध्ये आदिवासी पट्टा मोठ्या प्रमाणात आहे. रावणाला मानणारे अनेक आदिवासी याठिकाणी असल्याने राममंदिर हे त्यांना रुचलेले दिसत नाही.
याचा फटका मतदानामधून बसलाय. या वक्तव्यानंतर आता वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लोखंडे यांनी कर्जतला भेट दिल्यानंतर तेथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिर्डीत झालेल्या पराभवाची कारणे काय आहेत? या प्रश्नावर ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी राजकीय गटतट विषयी देखील भाष्य केले.
ते म्हणाले उत्तरेत कारखानदारांचे साम्राज्य असून त्यांचे गटतट असून त्यांमध्ये मोठा संघर्ष आहे. या संर्घषामुळे व राजकीय गटातटामुळे माझा बळी गेला असल्याचेही सूतोवाच त्यांनी केले. म्हणजे त्यांचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ. बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्षाकडे अंगुलीनिर्देश होता असे म्हटले जाते.