Ahmednagar Politics : लोकसभेला महाविकास आघाडीने सुंदर पद्धतीने केली व्यूहरचना, फोडाफोडीचे राजकारण अन तपास यंत्रणांचा सुरु असणारा गैरवापर याला वैतागलेल्या जनतेस दिलेले आश्वासन, दलित-मुस्लिम समाजाची ठोस भूमिका यामुळे महाविकास आघाडीस विशेषतः शरद पवार गटास मोठे यश मिळाले.
यातील अहमदनगर लोकसभेच्या विजयाची मोठी चर्चा पाहायला मिळाली. याचे कारण म्हणजे दिग्गज विखे कुटुंबामधील सुजय विखेंचा पराभव व निलेश लंके यांचा विजय. आता विधानसभेलाही महाविकास आघाडीने शड्डू ठोकला असून पारनेर मतदार संघात सध्या तरी लंके हेच वरचढ दिसत आहेत.
याचे कारण म्हणजे एकीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून लंके यांच्या पत्नी राणी लंके यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अजित पवार गट व भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत निश्चिती नाही.
दरम्यान लंके यांच्याविरोधात विरोधक एकत्रित मोट बांधणार का? याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांना पारनेर तालुक्याने मोठे मताधिक्य दिले. माजी आमदार विजय औटी, माजी सभापती काशीनाथ दाते, सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड आदींनी विखे यांच्या बाजूने काम केल्याने यातील बरेचसे महायुतीकडून आमदारकीला इच्छुक असल्याची चर्चा आहे.
नीलेश लंके हे खासदार झाल्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडेच विधानसभा उमेदवारी येणार, असे पक्षाचे कार्यकर्ते सांगत आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके याच प्रमुख दावेदार असतील. त्यांनी वैयक्तिक भेटीगाठी, संपर्क दौरा गावोगावी सुरू केला आहे.
एकीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून लंके यांच्या पत्नी राणी लंके यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना आता राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपकडून काही नावांची शक्यता समोर येत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गट
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड व तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांची नावे विधानसभेसाठी चर्चेत आहेत.
भाजप
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यावरच पारनेर विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. भाजप विधानसभा लढल्यास कोरडे हेच भाजपचे उमेदवार असू शकतात, असा संदेश भाजपने त्यांची नेमणूक करून यापूर्वीच दिला आहे.
आणखी काही इच्छुक
विखे यांचे कट्टर समर्थक भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांचीही नावे विधानसभा उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत.