Ahmednagar Politics : या सरकारला नाते आणि व्यवसाय यातील फरकच कळलेला नाही, बहीण भावाच्या नात्यात पैसे हे कधीच येत नाहीत व व्यवसायात प्रेम कधीच करायचे नसते, असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी कर्जत तालुक्यात सरकारवर टीकास्त्र सोडले.
कर्जत-जामखेड मतदारसंघात महिला भगिनींना सन्मान आणि विश्वास देण्यासाठी ‘बंधन – नाते सन्मानाचे, विश्वासाचे’ या कार्यक्रमाचं आयोजन पाटेगाव येथे आ. रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार. खा. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, आ. रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, बहीण सईताई यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. या वेळी सुनंदा पवार यांनी प्रास्ताविक करताना आ. रोहित पवार वरील माता भगिनींचे प्रेम पाहून आई म्हणून उर भरून आले आहे.
दुष्काळी कर्जत-जामखेड मतदार संघात आठ महिने टँकरने पाणी पुरवठा केला, हे सोपे नव्हते, मात्र ते करून दाखवले. माझा मुलगा मी या मतदार संघातील माता भगिनींच्या ओटीत टाकला आहे. तो कोठेही कमी पडणार नाही. माझ्या व तुमच्या अपेक्षे प्रमाणे रोहित दादा येथे चांगले काम करतो आहे.
कोरोना काळात अनेकांचे जीव वाचवले, सरकार गेले, मंजूर कामे थांबवली गेली, अनेक अडचणी आणल्या गेल्या, पण तो थांबला नाही. दादा थांबला नाही, तो लढतो आहे संघर्ष करतो आहे कारण तुम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहात, असे म्हणत आ. रोहित पवार यांचे प्रगती पुस्तकंच प्रकाशित करत ते सर्वांनी बारकाई पहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात आ. रोहित पवार यांना अनेक महिलांनी रक्षा बंधनचे औचित्य साधत राख्या बांधल्या. या वेळी आ. रोहित पवार यांनी बोलताना मतदारसंघातील तरुणांचे भविष्य घडविणारी एमआयडीसी याच पाटेगावच्या भूमीत आपण करणार आहोत. मात्र, आपल्या विरोधकांनी युवकांच्या आयुष्याशी खेळत त्याला स्थगिती दिली आहे, म्हणून याच भूमीत हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगत विरोधकांनी काहीही करू द्या,
मी बहिणींना शब्द दिलायं याच भूमीत एमआयडीसी होणार, असे सांगताना आगामी काळात गावागावात बंधन समिती स्थापन करणार असून यामध्ये महिलांच काम करतील व काय काम करायचे, हे ठरवतील व त्याप्रमाणे आम्ही काम करू, असे जाहीर करत गेल्या पाच वर्षात घरातील महिला बाहेर येऊन विविध कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ लागल्या.
हाच विश्वास महत्त्वाचा असून, त्यासाठी आपण अनेक कामे केल्याचे सांगितले, आगामी काळात या भावाच्या विरोधात मोठी ताकद येणार आहे. महाराष्ट्रातील मोठ मोठे नेते माझ्या विरोधात येणार आहेत. अनेक जण मत खाण्यासाठी उभे राहणार आहेत. थेट दिल्लीतून ताकद येणार आहे, अशा काळात माझ्या मागे उभे राहणार की नाही, असे विचारताच उपस्थित हजारो महिलांनी त्यांना हो म्हणत प्रतिसाद दिला.
तुम्हीच मला लढायला शिकवले असून, तुमच्यासाठी मी भल्या भल्यांविरुध्द लढायला तयार असल्याचे म्हंटले. या वेळी खा. सुप्रिया सुळे यांनी या भागातील सर्व प्रश्न व त्यावर केलेल्या कामाची रोहित पवार यांनी दिलेली माहिती व तुमचे प्रेम जवळून पाहण्याचा योग आला. आ. रोहित पवार आज जेथे उभा आहे, याचे संपूर्ण श्रेय त्याच्या मातोश्री सुनंदा वहिनी यांना जाते, असे म्हंटले. या वेळी लाडकी बहीण योजनेवरून खा. सुळे यांनी जोरदार ताशेरे ओढत
आज राज्यातील महिला आपल्या सुरक्षिततेची ग्वाही मागत असल्याचे म्हंटले. आम्हाला पंधराशे नको, आम्ही दोन हजार देतो, पण आमच्या लेकीबाळी सुरक्षित असल्या पाहिजेत, हे सरकार कधी ऐकणार, असा प्रश्न उपस्थित केला. या वेळी खा. निलेश लंकेना निवडून दिल्याबद्दल आभारही मानले.