Ahmednagar Politics : मला जनेतेने ५६ वेळा निवडून दिले. आता एकच मागायचे आहे. महाराष्ट्रात सर्वसामान्यांची सत्ता येईल, कष्टकरी, शेतकरी, माता- बहिणींचा विचार करणारे सरकार आणायचे आहे.
ती तुम्हा सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. सामुदायिक शक्ती एकत्र आली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (दि.१९) येथे केले. आणि हे करत असतानाच
त्यांनी अकोलेमधून अमित भांगरे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. या आधारे त्यांनी एकप्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील आपला पहिलावहिला विधानसभेचा उमेदवार जाहीर केलाय.
काय म्हणाले शरद पवार
याठिकाणी डॉक्टरला संधी दिली होती. अगदी चांगला माणूस, शब्दाला जागेल लोकांची साथ सोडणार नाही असे अपेक्षित होते. इथे येऊन तुम्हाला भाषण देत पवारांची साथ कधीही सोडणार नाही असं सांगितले आणि तिकडे मुंबईला जात भलतीकडेच जाऊन बसला.
कुठं बसायचे हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचे हे काम विधानसभेच्या निवडणुकीत करा. अमित भांगरे व त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही शक्ती द्या, पाठिंबा द्या मी तुम्हाला खात्री देतो अकोले तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
अशोकराव भांगरे यांनी त्यांच्या विचारांची नवीन पिढी तयार केली. त्यांच्याकडून अकोल्यातील गोरगरीब, कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडविण्याचा विचार होता. एका कार्यक्रमात अशोकराव मला अस्वस्थ दिसले.
त्यांना विचारले तेव्हा म्हणाले, की ‘मला काही मागायचे नाही. फक्त एक काम करा, माझ्या मुलावर, अमितवर लक्ष ठेवा’ ही विनंती जाहीर कार्यक्रमात केली. जनतेसाठी आयुष्य झोकून देऊन काम करणारे अशोकराव अजातशत्रू नेते होते. तुम्ही लोकांनीही त्यांचा शब्द पाळला असेही ते म्हणाले.