Ahmednagar Politics : माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी राम मंदिरामुळे माझा पराभव झाला असे वक्तव्याकेले होते. त्यावरून वातावरण तापायला लागले अन ते टीकेचे धनी झाले. त्यानंतर त्यांनी या वक्तव्यावरून युटर्न घेत काही आदिवासी समाज रावणाचे भक्त असल्याने ते णर्ज झाले होते व याचा फटका बसला असे वक्तव्य केले.
या वक्तव्यानेही ते अडचणीत आले आहेत. संपूर्ण आदिवासी समाजाला रावण संबोधल्याने माजी खा. लोखंडे यांचा आदिवासी विकास परिषद संघटना, वारकरी संप्रदाय यांच्या वतीने निषेध करण्यात आला. आदिवासी समाजाची लोखंडे यांनी माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी समाज हा परंपारिक वारकरी संप्रदायातील आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात मारुतीचे व विठ्ठल रुख्मिणीचे मंदिर आहेत. गावातील भाविक पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी, आयोध्या, काशी, तिरुपती, कोल्हापूर, चारीधाम, वणी, महालक्ष्मी आदी धार्मिक ठिकाणी जातात. आदिवासी समाज मंदिरात भजन, किर्तन परंपरेने करीत आला आहे.
अनेक गावांत होणाऱ्या बोहडा कार्यक्रमात गणपती, भगवान महादेव, प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, महालक्ष्मी, सरस्वती व विविध देवतांचे मुखवटे घालून लोक नृत्य करतात, याकडे लक्ष वेधण्यात आले. अकोले तालुक्यामधील हरिश्चंद्रगड, रतनवाडी येथे हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन शिवकालीन मंदिरे आहेत.
आदिवासी भागामधील विविध गावांत वाल्मिक ऋषी, भैरवनाथ, सप्तश्रृंगी आई, कळमजाआई, उंबरदेव, घाटनदेवी आदी देवी-देवतांचे मंदिर असून, आदिवासी समाज पिढयांनपिढया पुजा व यात्रा उत्सव करीत आला आहे. आदिवासी नागरिकांचे नांवे देखील देवी-देवतांवरुन ठेवण्यात आले आहेत. रावण कुणाचे नाव आहे का, हे लोखंडे यांनी शोधून सांगावे, असे आव्हान देण्यात आले.
आरंभ सामाजिक प्रतिष्ठानकडूनही निषेध
प्रभु श्रीराम मंदिराबाबत नैराश्येतुन केलेल्या विधानाबद्दल माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचा आरंभ सामाजिक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध केला. दरम्यान, या वादग्रस्त विधानाबद्दल लोखंडे यांनी जाहीर माफी न मागितल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रुपेश हरकल व योगेश ओझा यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.