Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतशा आता आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. राहुरीत देखील आता राजकीय वातावरण तापू लागले आहे.
आजी माजी आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत. आता राहुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. प्राजक्त तनपुरे यांनी माजी आ. शिवाजीराव कर्डीले यांवर टीका केली आहे. तनपुरे म्हणाले, पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगवतात तसाच प्रकार माजी आमदार कर्डिलेबाबत झाला आहे.
निवडणुकीची चाहूल लागताच त्यांना राहुरीची ओढ लागली आहे. १० वर्ष निष्क्रिय राहिल्यानेच त्यांना जनतेनी जागा दाखवून दिली होती. मागिल ५ वर्ष घरी काढल्यानंतर राहुरीत प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत असल्याचे पाहून कागदी पुरावे मागणाऱ्या कर्डिलेंनी आपल्याच शासनाने मला पाठविलेले पत्र कोणाकडून तरी वाचून घ्यावे, असा टोलाही तनपुरे यांनी लगावला आहे.
या पत्रकार परिषदेत आ. तनपुरे यांनी ग्रामिण रुग्णालय इमारत मंजुरीबाबत कागदोपत्री पुरावे सादर करत सांगितले की, ग्रामिण रुग्णालयाचा प्रश्न महाविकास आघाडी शासन काळातच मार्गी लागला होता.
परंतु न्यायालयीन अडसर निर्माण झाला. न्यायालयीन वाद सोडविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच राज्यात सत्तांतर झाले. जागेबाबत भुमी अभिलेख कार्यालय तसेच जागेबाबत तक्रारदार यांच्या वेळोवेळी बैठक घेत वाद संपुष्टात आणला. वाद मिटल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ग्रामिण रुग्णालय तसेच प्रशासकीय इमारतीचे बांधकाम शहराबाहेर हलविण्याचा निर्णय घेतला.
राहुरी विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी असतानाही सत्ताधारी गटाने कोणताही विचार विनिमय न करता प्रशासकीय इमारतीसह ग्रामिण रुग्णालय शहराबाहेर नेण्याचा घाट घातला. त्याबाबत आक्षेप नोंदवित विधीमंडळात प्रश्न उपस्थित केले.
लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच भाजपच्या नेत्यांनी ग्रामिण रुग्णालय व प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम केले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात पुन्हा प्रश्र उपस्थित केल्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना आ. तनपुरे यांच्या सुचनेनुसारच योग्य निर्णय घेण्याचा शब्द दिला होता.
त्यानंतर मंत्री सावंत यांच्यासमवेत बैठक होऊन राहुरीचे ग्रामिण रुग्णालय आहे त्याच जागेवर बांधण्याचा निर्णय झाला. त्या बैठकीत आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर व जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय घोगरे उपस्थित होते.
२५ जुलै रोजी आरोग्य विभागाकडून अधिकृतप पत्र प्राप्त होऊन १७ कोटी ३२ लक्ष ६० हजार रुपयांचे अंदाजपत्रक व आराखड्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे लेखी पाठपुराव्याचे पत्रच आ. तनपुरे यांनी दाखविले.