Ahmednagar Politices : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर व शिर्डी या दोन्हीं मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सुजय विखे यांचा पराभव नक्की कशामुळे झाला याचा आणि इतर कारणांचा आढावा घेण्यासाठी भाजपाने निरीक्षक म्हणून खासदार मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे.
या बाबत आढावा घेण्यासाठी खा.मेघा कुलकर्णी या नगरमध्ये आल्या होत्या. त्यांनी भाजपाच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर हा रिपोर्ट लवकरच केंद्राकडे सादर करणार असल्याचे सांगितले.
यावेळी आयोजित बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या, लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. नगरमध्ये जरी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी न थांबता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा मी घेतला असून लवकरच तो केंद्राकडे सादर करणार आहे. दरम्यान पक्षाच्या आढावा बैठकीचे निरोप शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना जाणूनबुजून देण्यात न आल्याची तक्रार यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खा.कुलकर्णी यांच्याकडे करत अनेक तक्रारींचा पाढा त्यांच्या पुढे वाचला.
खा.कुलकर्णी म्हणाल्या कि, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजपा विरोधात अपप्रचार करत नागरिकांच्या मनात खूप मोठ्याप्रमाणात संभ्रम निर्माण केले आहेत.
त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी जास्तीत जास्त संपर्क साधून त्यांच्या मनातील भाजप बद्दलचे संभ्रम व विरोधकांनी केलेला अपप्रचार दूर करण्यासाठी काम करावे. तसेच शहरातील पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. या सर्व बाबी वरिष्ठांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी पक्षाचा शहर विधानसभा निवडणूक प्रमुख असूनही लोकसभा निवडणूकीच्या आढावा बैठकीचे निमंत्रण मला नव्हते. त्यामुळे मी आजच्या बैठकीला उपस्थित नव्हतो. अशी तक्रार महेंद्र गंधे यांनी केली.