Ahmednagar Politics : ‘त्यांना’ लोकसभा निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागली; थोरात यांची विखे यांच्यावर टीका

Pragati
Published:

Ahmednagar Politics : नगर जिल्ह्यात सत्तेचा दुरूपयोग करून त्रास दिला जात होता. या प्रकाराला जनता कंटाळली. जनतेने निवडणुकीत मतांच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला.

दादागिरीच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करीत आता जनता या दबावाला न जुमानता उघडपणे विरोध करीत आहे. यामुळे ‘त्यांना’ लोकसभा निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागली, अशी टीका आ.थोरात यांनी नामोल्लेख न करता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर केली.

नुकतीच खासदार सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर खासदार लंके यांनी आमदार थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अमृत उद्योग समूहाच्या वतीने खासदार लंके यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार थोरात बोलत होते. ते म्हणाले, नगर दक्षिणची लढाई ही श्रीमंत विरुद्ध गरीबाची होती. खासदार लंके सामान्य परिवारातील आहेत. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या लोकप्रियतेची धास्ती घेऊन विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दडपशाहीचा वापर केला.

सामान्यांच्या विकासाऐवजी ते जिरवा जिरवीचे राजकारण करून दडपशाही करत आहेत. दिल्लीतही खासदार लंके यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तर खासदार लंके म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीमध्ये माझी लढाई बलाढ्य शक्तीशी होती. अशा या लक्ष्यवेधी ठरलेल्या लढाईत झालेल्या माझ्या विजयात माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी आपल्या विजयात श्रीकृष्णाची भूमिका बजावली आहे.

माझ्या विजयाचे खरे किंगमेकर आमदार थोरात आहेत. मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे; परंतु संघर्षातून पुढे आलो आहे. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, आमदार थोरात यांचा विश्वास आणि जनतेची साथ, यामुळे बलाढ्य शक्तीचा पराभव करण्यात यश मिळाले आहे.

आगामी काळामध्ये जिल्ह्यात सर्वांना बरोबर घेऊन आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेत महाविकास आघाडीच्या विजयासाठी सर्वांनी काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe