Ahmednagar Politics : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि राजकीय वातावरण तापले. अहमदनगरमध्येही त्याचे पडसाद दिसले. पटोले यांची कृती पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारी आहे असे वक्तव्य भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले होते.
आता युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडकेंकडून भाजप जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्या या वक्तव्याच्या समाचार घेण्यात आलाय. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी टीका केलीये. सोमनाथ कांडके म्हणाले, हे वक्तव्य करण्याआधी त्यांनी आपल्या पक्षात असणारा अंधार पाहावा.
भाजपचे असणारे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल निषेधार्ह वक्तव्य केले होते. यावरच ते थांबले नाहीत तर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरही त्यांनी गरळ ओकलेली होती. तेव्हा कोठे गेली होती महाराष्ट्राची परंपरा? आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीहल्ला करताना कुठे गेली होती परंपरा?
त्याचप्रमाणे त्यांच्याच एका नेत्याने नगरच्या नेत्याने निवडणुकांआधी शंभर बोकडे कापून पार्टी दिल्याची टीका झाली होती. मुक्या प्राण्यांची हत्या करताना कोठे गेली महाराष्ट्राची परंपरा? त्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करण्याआधी आपल्या पक्षात असणारा अंधार दिलीप भालसिंग यांनी पाहावा.
दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे तरी देखील शेतकऱ्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्याचा विचार आधी त्यांनी करावा. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या एका नेत्यावर प्रसिद्धीसाठी आरोप करून त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. आम्ही त्याचा निषेध करतो असे त्यांनी म्हटले आहे.