Ahmednagar Politics : लोकसभेची निवडणूक ही जनतेच्या अस्मितेची होती. लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नाला फळ मिळाले असून भाजपाला महाराष्ट्राने रोखले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या ३१ जागा विजयी करण्यामध्ये आमदार बाळासाहेब यांचा मोलाचा वाटा आहे. असे मत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी
मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर शिर्डीचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार वाकचौरे बोलत होते. ते म्हणाले शिर्डी मतदारसंघांमध्ये आमदार थोरात यांची प्रचार यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत होती. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात यांनी प्रचाराचे चांगले नियोजन करत योग्य रणनीती आखल्याने मोठे मताधिक्य मिळाले आहे.
त्यामुळे लोकसभेच्या विजयात आमदार थोरात यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. असे मत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले. दरम्यान या निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत झाली होती.
या अटीतटीच्या लढतीत निलेश लंके २९ हजार ३१७मते मिळवत विजयी झाले. तर दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा ५० हजार ५२९ मतांनी पराभव करत विजय मिळवला.
या विजयात मोलाचा वाट असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर येथील राजहंस दूध संघ येथे खासदार वाकचौरे यांनी त्यांचा सत्कार केला. तर दूध संघाच्या वतीने नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा आमदार थोरात यांनी सत्कार केला.
यावेळी संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, आर.बी. रहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, विलास वर्षे, भारत मुंगसे, सुरेश थोरात, शिवसेनेचे अमर कातारी, अशोक सातपुते, उत्तमराव घोरपडे, विलास गुळवे, विष्णू ढोले, संतोष मांडेकर, वैष्णव मुर्तडक, नितेश शहाणे, अनिल भोसले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.