Ahmednagar Politics : आमदार बबनराव पाचपुते यांनी राजकारणात प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आता या प्लाटफार्मवर विक्रमसिंह व प्रतापसिंह तुम्हाला गाडी पुढे चालवायची आहे.प्रतिभा पाचपुते यांचा चांगला जनसंपर्क आहे. पण तुम्हा दोघा भावांचा जनसंपर्क खुप कमी पडत आहे.
तुम्ही फोन उचलत नाहीत, आमची विधानसभा निवडणुकीत उतरण्याची केव्हाही तयारी आहे. विजय आपलाच राहणार आहे. परंतु तुम्हा दोघा भावांना जमीनीवर राहुन नेतृत्व करावे लागेल. अशा परखड शब्दात भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी पाचपुतेंना सुनावले.
डॉ. सुजय विखे यांनी भरपूर विकासकामे केली पण…
लोकसभेत डॉ. सुजय विखे पाटील यांना श्रीगोंद्यातून लीड का देता आले नाही, यावर चिंतन करण्यासाठी श्रीगोंदा येथील पाचपुते यांच्या निवासस्थानी आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांची चिंतन बैठक करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्ते भावना व्यक्त करताना म्हणाले कि, डॉ. सुजय विखे पाटील यांनी भरपूर विकासकामे केली पण पवार, ठाकरेंची सहनभुतीची लाट, कांदा, दुध प्रश्नामुळे घोळ झाला.
आतापासून सावध भुमिका
विखे पाटलांनी चांगले नियोजन केले पण प्रचाराची रणनिती कुठे चुकली, यावर पक्ष पातळीवर विचारमंथन होण्याची गरज आहे. यापुढे शेतकऱ्यांबाबत सकारात्मक राहण्याची गरज आहे. आ. पाचपुते म्हणाले की सन २०१४ मध्ये सर्वांनी हलगर्जीपणा केला. मात्र त्याची आपल्याला मोठी किमत मोजावी लागली. विधानसभा उमेदवारीबाबत महायुतीचे निर्णय घेतील.पण विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपणास आतापासून सावध भुमिका घ्यावी लागेल. लोकांची मने जिंकावी लागतील.
विखे समर्थकांनी फिरवली पाठ
लोकसभा निवडणुकीतील डॉ. सुजय विखे पाटील यांचा झालेला पराभव हा डॉ. विखे पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी आयोजीत केलेल्या या चिंतन बैठकीकडे तालुक्यातील विखे समर्थकांनी पाठ फिरवत आपली नाराजी व्यक्त केली.
माझ्या विषयी चुकीची चर्चा
हिरडगाव साखर कारखान्यामुळे अडचणी होत्या, त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करणे अवघड होते. मात्र आता त्या आडचणी संपल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील नियोजनाबाबत माझ्या विषयी चुकीची चर्चा होते आहे. सर्व मित्र पक्षांतील प्रमुख नेत्यांकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे नियोजन दिले होते. आगामी निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने सर्वांना बरोबर घेऊन काम करावे लागणार आहे. – विक्रमसिंह पाचपुते
या बैठकीस माजी सभापती पुरुषोत्तम लगड, अरुणराव पाचपुते, गणपतराव काकडे, पोपटराव खेतमाळीस, डॉ. प्रतिभा पाचपुते, बाळासाहेब महाडीक, ॲड. प्रतापसिंह पाचपुते, संदीप नागवडे, बापु गोरे, संग्राम शिंदे, अशोक खेंडके, महेश दरेकर, सुरेश भंडारी, सतिश धावडे, दिपक शिंदे, राजेंद्र उकांडे, अशोक ईश्वरे, संतोष गुंड, धोंडीबा लगड, गणेश झिटे, कुंडलिकराव दरेकर आदि उपस्थित होते.