Ahmednagar Politics : खा. निलेश लंके व माजी खा. सुजय विखे यांच्यात लोकसभेच्या प्रचारावेळी मोठा कलगीतुरा रंगलेला होता. एकमेकांवर आरोपप्रत्यारोप होत होते. यातील काही मुद्दे चांगलेच गाजले. त्यापैकी एक म्हणजे निलेश लंके यांच्या इंग्रजी बोलण्याविषयी सुजय विखे यांनी केलेले वक्तव्य.
दरम्यान या नंतर यावरून अनेक चर्चाही रंगल्या होत्या. दरम्यान आता निलेश लंके यांनी इंग्रजीत बोलून सुजय विखेंना अप्रत्यक्ष टोलाही लगावला आहे. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेसचा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेला रौप्यमहोत्सवी सोहळा.
नेमके काय घडले?
या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात बोलताना निलेश लंके यांनी विखे पाटील यांना टोला लगावत कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करू नका असे सुचवत चक्क इंग्रजी वाक्य ते याठिकाणी बोलले. त्यांच्या या इंग्रजी वक्तव्यानंतर सभागृहात एकच जल्लोष पाहायला मिळाला.
नाद करा पण पवार साहेबांचा नका करू बाळांनो, भले भले थकले पवार इज द पॉवर… असे इंग्रजी वाक्य ते बोलले व यातून त्यांनी थेट सुजय विखेंवर निशाणा साधला असे म्हटले जात आहे.
विजयानंतरही केली होती मिश्किल टिपण्णी
विजयानंतर मी शरद पवारसाहेबांना फोन केला. त्यांना म्हणालो, मला इंग्रजी येत नाही. त्यावेळी ते म्हणाले, काळजी करू नका, मी शिकवतो. माझा आत्मविश्वास वाढलाय. मी संसदेत इंग्रजीत भाषण करणार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांनी विजयानंतर मिश्कील टिप्पणी केली.
विजयानंतर अहमदनगर मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांना पत्रकारांनी इंग्रजी भाषेबद्दलच्या टीकेबद्दल छेडले असता त्यांनी वरील उत्तर दिले होते. लंके म्हणाले, मला सर्वांचीच साथ मिळाली. गरीब माणसाला विजयी करून त्यांनी लोकशाहीची ताकद दाखवून दिली.
धनशक्तीची ताकद त्यांनी धुडकावून लावली. हा विजय सर्वांचाच आहे. विकास काय असतो ते दाखवून देऊ असेही ते यावेळी म्हणाले होते.