Ahmednagar Politics : विधानसभेसाठी महायुती तयारीला लागली आहे. महायुतीमधील शिंदे गट, अजित पवार गट व भाजप तीनही पक्ष आगामी धोरणे आखत आहे. परंतु आता या वाटचालीमध्ये आगामी आमदारकीच्या अनुशंघाने अहमदनगर भाजपात अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे माजी आ. शिवाजी कर्डीले, आ. राम शिंदे, माजी आ. पिचड, माजी खा. सुजय विखे हे गॅसवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. नगर जिल्ह्यात अकोले, कोपरगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, कर्जत-जामखेड या सहा विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मागील निवडणुकीत विजयी झाले.
त्या जागांवर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. त्यामुळे राहुरीतून भाजपकडून इच्छुक असणारे माजी आ. शिवाजी कर्डीले, कर्जत-जामखेड मधून आ. शिंदे, राहुरीतून आमदारकीला विखे कुटुंब देखील इच्छुक असल्याची चर्चा होती त्यामुळे विखे देखील तसेच अकोलेतील भाजपचे माजी आ.पिचड यांचे आता काय होणार अशी चर्चा आहे.
आगामी विधानसभेला संधी मिळेल की नाही अशी धाकधुकी या नेत्यांना लागली असेल का? असा सवाल नागरिकांना पडलाय.
राष्ट्रवादीमुळे मातब्बर कोंडीत
मागील विधानसभा निवडणुकीत ज्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्या जागा महायुतीच्या जागा वाटपप्रसंगी मागणार आहोत, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.
यात राहुरी विधानसभा मतदार संघाचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढविली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे तळागाळात पोहोचलेले चिन्ह ‘कमळ’ कोमेजणार असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी एक पंचवार्षिक व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दोन पंचवार्षिकमध्ये विजय मिळविला. राहुरीत सलग १५ वर्षे भाजपचे कमळ फुलले. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला होता.
आता राहुरीतील राष्ट्रवादीच्या दाव्याने कर्डीले यांची कोंडी होऊ शकते असे म्हटले जाते. तसेच राहुरीतून विखे कुटुंबीय मधून एखादाड चेहरा उभा राहू शकतो अशीही चर्चा होती. त्यांचीही कोंडी होऊ शकते. अशीच काहीशी स्थिती अकोले, कर्जतजामखेड मध्येही होऊ शकते.
येथे भाजपकडून माजी आ. पिचड व आ. राम शिंदे इच्छुक आहेत. आता यात आ. शिंदे हे विधानपरिषदेवर असल्याने त्यांच्याबाबत ही शक्यता गृहीत धरता येणार नाही परंतु पिचड यांची मात्र आमदार होण्याची इच्छा इच्छाच राहणार का? असा सावलीही नागरिकांना पडला आहे.
पक्षांतर ?
या गोष्टींमुळे पक्षांतर करण्याच्या घडामोडी होऊ शकतात का? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरेल. नुकतेच माजी आ. कर्डीले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. पिचड हे देखील शरद पवार गटात जातील अशा चर्चांना पेव फुटले होते.