Ahmednagar Politics : एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले भाजपचे नेते माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले. एरवी एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या दोघांनीही यावेळी मात्र एकमेकांचे कौतुक केल्याने सर्वच राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून, हे दृश्य पुढील काळात वेगळ्या राजकीय गणितांची नांदी तर नाही ना, अशीच चर्चा शिर्डीसह जिल्ह्यात रंगली आहे.
देशभरात मुस्लिम बांधवांच्या वतीने बकरी ईद सण उत्साहात साजरा होत असताना भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील ईदगाह मैदानावर हजेरी लावत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात ५५ दात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती संस्थापक मेहमूद सय्यद यांनी दिली. या शिबिराच्या उद्घाटनस्थळी पोहोचण्यासाठी ईदगाह मैदान ते श्रीराम नगरपर्यंत डॉ. विखे यांनी दुचाकीवरून प्रवास केला.
कार्यक्रमस्थळी पोहोचताच विखे यांचे कट्टर राजकीय विरोधक काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले हेदेखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन परतीच्या वाटेवर निघाले होते; मात्र डॉ. विखे यांनी त्यांना आवाज देऊन, थांबवून, त्यांना जवळ बोलवून घेत हा कार्यक्रम काही राजकीय नाही, अशा सामाजिक कार्यक्रमासाठी राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे, असे मत व्यक्त केले.
त्यानंतर उडालेल्या हास्य कल्लोळात डॉ. विखे यांनी चौगुले यांचा राज्यातील लोकसभेच्या सर्वात जास्त जागा जिंकलेल्या पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून आदरार्थी उल्लेख केला. यावेळी शिर्डीतील एका राजकीय नेत्याने चौगुले यांना विलीन व्हा, असे म्हणताच डॉ. विखे पाटील यांनीदेखील विलीन व्हा म्हणता म्हणता आता आपल्यालाच विलीन होण्याची वेळ आली असल्याचे मिश्कीलपणे म्हटले.
या प्रसंगातून डॉ. विखे पाटील यांचा विरोधकांना आपलेसे करून घेण्याचा एक वेगळा पैलू उपस्थितांनी अनुभवला. चौगुले यांनीदेखील डॉ. विखे पाटील यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगत राजकीय जोडे बाजूला ठेवून सामाजिक कार्यात एकत्र येण्याचे म्हटले. दरम्यान या दोघांच्या भेटीमुळे एरवी हे दोघेही एकमेकांना पाण्यात पाहणारे कट्टर राजकीय विरोधक आज मात्र एकत्र आल्याने जिल्ह्यातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी डॉ. विखे हे निमंत्रित होते; मात्र मी योगायोगाने आलो असल्याचे सांगून डॉ. विखे पाटील यांनी या पुढील काळात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पुढील वाटचाल करावी, असे सुतोवाच केले.