सध्या विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. विविध विधानसभेत अनेक दिग्गज तयारीला लागलेत. दरम्यान शेवगाव पाथर्डीत आ.राजळे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार का?
की तेथे त्यांचा पत्ता कट केला जाईल? याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. तेथे पक्षांतर्गत विरोधही जोरात सुरु आहे. परंतु आता उमेदवारीबाबत थेट आ. मोनिका राजळे यांनीच स्पष्ट सडेतोड स्पष्टीकरण दिले आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिकीट आपल्यालाच, पक्षश्रेष्ठींचा आपल्यावर विश्वास असल्याने माझ्या उमेदवारीची चिंता सोडा अन तयारीला लागा असे आवाहन त्यांनी केले आहे.
नेमके काय म्हणाल्या आ. राजळे
तोंडोळी येथे आयोजित मेळाव्यात राजळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे यांचा आपल्यावर विश्वास असल्याने तिकीटाची आपल्याला चिंता नाही.
गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. सत्तेच्या माध्यमातून मोठा निधी आणला. मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे केली.
पक्षाशी प्रामाणिक राहून सर्व उपक्रम राबविले. जातीपातीचे राजकारण केले नाही. कुणाचा व्यक्तिगत व्देष केला नाही. मनामध्ये राग कधी धरला नाही. प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
एवढे करूनही ज्यांचे समाधान झाले नाही, त्यांचे आगामी काळात समाधान करू असेही त्या म्हणाल्या.
विकास कामाचा डोंगर पाहता उमेदवारी त्यांना
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा आपल्या मतदारसंघात ऐंशी हजार महिलांना लाभ झाला. शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, वीज बील माफी, लाडका भाऊ, महिलांना बस प्रवासात सवलत अशा वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना सरकारने सुरु केल्या.
मागील दहा वर्षांपासून आमदार राजळे सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत जनतेच्या सुख दुःखात आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क, प्रचंड मेहनत व मतदारसंघात त्यांनी उभा केलेला विकास कामाचा डोंगर पाहता उमेदवारी त्यांनाच मिळेल असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.