Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी या निवडणुकीत शिक्षकांसाठी प्रसिद्ध केलेला वचननामा हा सर्वव्यापक व सर्व समावेशक असा आहे. यात त्यांनी महिला शिक्षकांना प्राधान्याने स्थान दिले आहे.
महिला शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन विवेक कोल्हे यांनी यात दिले आहे. एका युवकाने दखल घेत महिला शिक्षकांच्या मागण्यांना प्राधान्य दिले, ही कौतुकास्पद बाब आहे. असे प्रतिपादन मिना नरवडे- चव्हाण यांनी केले आहे. शिक्षकांच्या कॉर्नर बैठकीत चव्हाण बोलत होत्या.
शैक्षणिक क्षेत्रात महिला शिक्षिका या मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विवेक कोल्हे यांनी जाहीर केलेल्या वचननाम्यात प्राधान्याने महिला शिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे महिला शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या पिढीकडून मोठ्या अपेक्षा आणि आशा आहेत, त्या विवेक कोल्हे पूर्ण करतील, याबद्दल शिक्षक वर्गात सकारात्मक चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विवेक बिपिन कोल्हे हे उमेदवारी करत आहेत. त्यांनी नुकताच आपला या निवडणुकीसाठीचा वचननामा जाहीर केला असून यात महिलांना प्राधान्याने आदराचे स्थान देण्यात आले आहे. शिक्षकांच्या प्रलंबित सर्व बाबींचा विचार यात करण्यात आला आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या बऱ्याच दिवसांपासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या प्रमाणात लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत नसल्याने त्या मार्गी लागत नाही.
यात विनाअनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न, शिक्षकांना वारंवार दिली जाणारी अशैक्षणिक कामे, जुनी पेन्शन योजना, कमी पटसंख्येमुळे तुकडी बंदचा निर्णय यांसारखे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शिक्षक व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विवेक कोल्हे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत.