राजकारण

Ahmadnagar Lok Sabha Election : अहमदनगर दक्षिणची लोकसभा निवडणूक होणार रंगतदार, डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात कोण उभे राहणार ?

Published by
Tejas B Shelar

Ahmednagar Politics : लोकसभा-2024 निवडणुकांसाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. यामुळे सर्वत्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे हे वेगळे सांगायला नको. जिल्ह्यात दररोज काहीतरी नवीन घडामोड घडत आहे. खरे तर अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. सहकाराच्या क्षेत्रात जिल्ह्याने संपूर्ण जगात आपली ख्याती बनवली आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या या जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभेच्या दोन जागा आहेत. उत्तरेकडील शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिणेकडील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या दोन जागा आहेत. यापैकी मात्र दक्षिणेकडील निवडणूक 2019 प्रमाणे 2024 मध्ये देखील रंगतदार बनणार असे पाहायला मिळत आहे.

साखर वाटपातून खा.विखे पाटलांची मतपेरणी

नगर दक्षिण मतदार संघातील सध्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा याच जागेवरून आपल्याला तिकीट मिळावे यासाठी साखर वाटपाचा कार्यक्रम हाती घेऊन मत पेरणीला सुरुवात केली आहे. या साखर वाटपाच्या आणि चणाडाळ वाटपाच्या कार्यक्रमातून डॉक्टर सुजय विखे यांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खासदार महोदय स्वतः गावागावात जाऊन साखर वाटप करत आहेत.

दुसरीकडे राजकारणातील तज्ञ मंडळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांचे या जागेवरून तिकीट जवळपास पक्के असल्याचे बोलत आहेत. खरंतर विखे पाटील पिता-पुत्र आधी काँग्रेसमध्ये होते. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आणि भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांना नगर दक्षिणेतून तिकीट मिळाले आणि त्यांनी या जागेतून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना पराभूत करून विजय मिळवला.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात विखेंची पॉवर !

वास्तविक, अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेत राष्ट्रवादीची पकड आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादीचे आहेत. जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे एकूण सहा आमदार होते. पण, राष्ट्रवादीत उभी फूट पडली अजितदादांकडे चार आमदार गेलेत आणि शरदचंद्रजी पवार यांच्याकडे दोन आमदार गेलेत. अजित दादा महायुतीत आहेत. दरम्यान, महायुतीत असलेल्या अजित दादांकडे अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याचा बहुमान आहे.

विशेष म्हणजे नगर दक्षिणेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट दोन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दोन, भाजपा दोन असे आमदार आहेत. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती तेव्हा या मतदारसंघात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीकडे होते. आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे तरीदेखील अजितदादांकडे या मतदारसंघात दोन आमदार आहेत. म्हणजेच नगर दक्षिणेत देखील राष्ट्रवादीचा मोठा बोलबाला आहे.

परंतु जेव्हा लोकसभेचा विषय येतो तेव्हा नगर दक्षिण ही लोकसभेची जागा भाजपाच्या तावडीत जाते. याला इतिहास साक्ष आहे. नरेंद्र मोदींचा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी देखील या जागेबाबत अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे.

1999 ते 2019 या कालावधीत या जागेचे भाजपच्या खासदाराने प्रतिनिधित्व केले आहे. या जागेवरून भाजपाचे दिलीप गांधी हे तीन वेळा खासदार बनले आहेत. मागील इलेक्शन मध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी याच जागेवरून संग्राम जगताप यांना विक्रमी मतांनी पराभूत करून नवी दिल्लीतील संसद गाठली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची रंगतदार लढाई

अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघात येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची रंगतदार लढाई पाहायला मिळणार आहे. भाजपकडून डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे चित्र आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप या जागेसाठी उमेदवार निश्चित झालेला नाही. एनसीपीकडून या जागेसाठी विविध नावे पुढे येत आहेत.

मध्यंतरी खासदार सुप्रिया सुळे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे देखील नाव या जागेसाठी पुढे आले होते. परंतु स्वतः रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे किंवा मी या जागेसाठी उमेदवार नसणार हे स्पष्ट केले होते आणि लवकरच या जागेसाठी आम्ही उमेदवार जाहीर करू असे देखील सांगितले.

पण, जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ होते तेव्हा आमदार निलेश लंके हे या जागेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार राहणार असे बोलले जात होते. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांच्यातला राजकीय संघर्ष फार जुना आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात लंके यांच्या नावाची विशेष चर्चा होत होती.

निलेश लंके यांच्या नावाची चर्चा मागे

परंतु राष्ट्रवादीत फूट पडली आणि आमदार निलेश लंके अजितदादा यांच्यासमवेत महायुतीत समाविष्ट झालेत. यामुळे निलेश लंके यांच्या नावाची चर्चा कुठेतरी मागे पडली आहे. पण, निलेश लंके यांच्या पत्नी सौ राणी लंके यांनी या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

राणी लंके यांनी नगर दक्षिणेतून एकतर मी किंवा माझे पती लोकसभा लढवणार असे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवस्वराज्य यात्रा देखील काढली होती. या यात्रेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत नगर दक्षिणेतून लोकसभा लढवणार असा निर्धार केला आहे.

म्हणजे पक्षातून तिकीट मिळाले तर पक्षाकडून, अपक्ष किंवा मग अन्य पर्यायी मार्ग वापरून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर आमदार निलेश लंके यांनी एका घरात दोन मतप्रवाह असू शकतात असे म्हणत राणी लंके यांनाच पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच अहमदनगर मध्ये पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात आमदार निलेश लंके अनुपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूक रंगतदार होणार

यामुळे आमदार निलेश लंके पुन्हा एकदा शरद पवार गटात सामील होणार आणि नगर दक्षिणेतून डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात उभे राहणार अशा चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. तसेच जर आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या पत्नीला आगामी लोकसभेसाठी उमेदवारी दिली तर डॉक्टर सुजय विखे सुद्धा त्यांची पत्नी धनश्री विखे किंवा आई शालिनी विखे यांना उमेदवारी देऊ शकतात अशाही चर्चा पाहायला मिळत आहेत. यामुळे नगर दक्षिणची आगामी लोकसभा निवडणूक खूपच रंगतदार होणार आहे.

दुसरीकडे डॉक्टर सुजय विखे यांना स्व पक्षातून देखील विरोध होत आहे. विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा निवडणूक लढवू असे आमदार राम शिंदे यांनी म्हटले आहे.

एकंदरीत नगर दक्षिणेत साखर वाटपातून मत पेरणी करू पाहत असलेले डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात लंके कुटुंब उमेदवारी करणार अशी शक्यता आहे. यामुळे आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात कोण उभ राहत हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com