Maharashtra Politics : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांवर महायुतीचे जवळपास आता सर्वच उमेदवार जाहीर झाल्यात जमा आहेत. शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी व भाजप यांत हे जागावाटप झाले.
परंतु हे जागावाटप करताना यात भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या. परंतु यात अजित पवार यांना पाच जागा मिळाल्याचे दिसले पण प्रत्यक्ष त्यांच्या वाट्याला दोनच जागा आल्याचे दिसते.
उर्वरित तीन जागांपैकी दोन जागांवर मित्र पक्षांचे उमेदवार आपल्या पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिली तर मित्र पक्षाला अर्थात परभणीत जानकर यांना सोडावी लागली.
पक्ष फुटल्यानंतर सुप्रिया सुळे (बारामती), अमोल कोल्हे (शिरूर) व श्रीनिवास पाटील (सातारा) हे तीन खासदार शरद पवारांबरोबर तर सुनील तटकरे (रायगड) हे अजित पवार यांसोबत राहिलेले दिसले.
या चार जागा व आणखी दोन ते तीन जागा जस्ट द्याव्यात अशी अजित पवार गटाची मागणी होती. पण प्रत्यक्षात त्यांना कमी जागा मिळाल्याचे दिसते.
अजित पवार गटाच्या जागांचे नेमके गणित कसे ?
महायुतीच्या जागावाटपात बारामती, रायगड, उस्मानाबाद, शिरूर आणि परभणी या पाच जागा त्यांना आल्या होत्या. बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक रिंगणात आहेत. हे दोनच उमेदवार मूळ अजित पवार गटातील आहेत. उस्मानाबाद मध्ये
भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार यांना आपल्या पक्षात घ्यावे लागले व उमेदवारी द्यावी लागली. शिरूरमध्ये शिंदेसेनेचे आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत घ्यावे लागले व तिकीट द्यावे लागले. परभणीमध्ये महायुतीचे समर्थक राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी ती जागा सोडावी लागली.
साताऱ्यात उदयनराजे ..
अजित पवार गटाने साताऱ्यावर दावा केला होता पण भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी त्यांनी तो मतदारसंघ सोडला. पण त्या बदल्यात नाशिकची जागा भुजबळ यांच्यासाठी ते मागत होते परंतु शिंदेसेनेच्या हट्टापुढे नाशिकवर त्यांना पाणी सोडावे लागले.