राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार गट वेगळा झाला व भाजसोबत सत्तेत गेला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली रणनीती, पक्ष वाढवणे आदींकडे लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवारांसह अनेकांवर सध्या ते टीका करत असून विविध ठिकाणी पक्ष बांधणी मजबूत करत आहेत. त्यांनी आता अहमदनगरकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.
अहमदनगर दक्षिणचे काही पदाधिकारी नियुक्ती त्यांनी नुकत्याच केल्या होत्या. आता मोठी खेळी त्यांनी खेळली आहे. ज्येष्ठ नेते खा.शरद पवारांची अहमदनगरमध्ये चाचपणी सुरु होती. मुरकुटेंसह काही नेत्यांकडे ते चौकशी करत होते. ही चाचपणी सुरु असतानाच अजित पवारांनी जुना नेता गळाला लावला आहे.
संग्राम कोते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपातळीवर संधी दिली गेली असून त्यांची पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीमध्ये सचिव पदावर नियुक्ती केली आहे. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश या दोन्ही संघटनेच्या समन्वयकपदीदेखील नेमणूक केली गेली आहे.
संग्राम कोते पाटील हे आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे आता हा ज्येष्ठ नेते शरद पवारांसह थोरातांनाही धक्का मानला जात आहे.
संग्राम कोते पाटील..जुना पण ‘पॉवर’फुल ‘पत्ता’
संग्राम कोते पाटील हे 2019 पासून राष्ट्रवादी आणि राज्याच्या राजकारणापासून दूर गेलेले होते. आजारपणाचे कारण देत त्यांनी 2019 मध्ये राजीनामा दिला होता. कोते पाटील हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपासून पक्षाशी जोडले गेले असून त्यांनी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्षपद, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संघटन वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले, आंदोलने केली, तसेच ‘वन बूथ, टेन युथ’ ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे त्यांनी राबवली होती. त्यांच्या उपक्रमाचे व त्यांच्या कामकाजाचे स्वतः शरद पवार देखील कौतुक कारायचे.
ते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे. अजित पवार यांनी त्यांना मोठे बळ दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कोते पाटील यांनी शेकडो मोर्चे काढले आहेत. विशेष म्हणजे गाव आणि महाविद्यालय जिथे, तिथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची शाखा या उपक्रमातंर्गत तीन हजाराहून अधिक शाखा त्यांनी कार्यरत केल्या होत्या. त्यामुळे आता हा जुना पण ‘पॉवर’फुल ‘पत्ता’ अजित पवार यांनी बाहेर काढला आहे.
अजित पवारांची खेळी यशस्वी होणार का?
लोकसभा निवडणुका व त्या पाठोपाठ विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्या आहेत. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका होतील. म्हणजे साधारण वर्षभर निवडणुकांचं राहतील. अजित पवार हे माणसे हेरण्यात तरबेज आहेत.
ते संग्राम कोते पाटील यांच्यातील संघटन कौशल्य चांगले हेरून आहेत. त्यामुळे लोकसभेसह पुढील काळात येणारी प्रत्येक निवडणूक अजित दाद पूर्ण ताकदीने राज्यात लढणार असल्याने त्यांनी अहमदनगरमध्ये खेळलेली ही खेळी किती यशस्वी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.