Akole Politics News : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या फायर ब्रँड नेत्यांकडून आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात देखील दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडी अन महायुतीच्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी सरळ लढत आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे अन महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांच्यात लढत होत आहे. पण अपक्ष उमेदवार वैभव पिचड हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने या मतदारसंघाची यंदाची निवडणूक ही तिरंगी बनली आहे.
म्हणून पिचड हे कोणाचा गेम करणार? हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या प्रचार सभेदरम्यान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी विद्यमान आ. डॉ. लहामटे अन अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
यावेळी आमदार रोहित पवार यांनी हरियाणाच्या निवडणुकीचा दाखला देत भाजपालाही टार्गेट केले. ते म्हणालेत नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी काही अपक्ष उमेदवारांना बळ दिले होते. त्यांना रसद पुरवून वैचारिक उमेदवारांना पाडण्याचा डाव आखला आणि तो यशस्वी देखील झाला होता.
दरम्यान आता हिच निती भाजपाने अकोले तालुक्यात वापरली असल्याची टिका रोहित पवारांनी केली आहे. ते म्हणालेत की, ‘वैभव पिचड हे माघार घेणार होते. पण, डॉ. लहामटे यांना मदत व्हावी म्हणून भाजपाने पिचड यांना उमेदवारी करण्यास सांगितले आहे. वैभव पिचड हेचं अकोलेमध्ये भाजपाची बी टिम आहे. म्हणून त्यांच्या भावनिक प्रचारावर जाऊ नका.’
पुढे बोलतांना, आदरणीय मधुकर पिचड यांच्याविषयी डॉ. लहामटे हे प्रचंड घाण बोलतात. तरी देखील लहामटेंना विजयी करण्यासाठी वैभवराव मदत करत आहेत, हे फारच दुर्दैवी असल्याचे रोहितदादांनी म्हटले आहे. तसेच, आपला कट्टर विरोधक म्हणून डॉ. लहामटे यांना पाडण्यासाठी अमित भांगरे यांना पाठींबा द्यावा, अजून वेळ गेलेली नाही असे म्हणतं त्यांनी वैभव पिचड यांना इशारा सुद्धा दिला आहे.
आमदार लहामटे यांनी स्वतःचा विकास केला
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी मतदारसंघातील जनतेने यांना शंभर-दोनशे रुपये देऊन विजयी केले. पण हे शरद पवार साहेबांसोबत राहिले नाहीत. हे म्हणालेत की यांना विकास करायचा आहे. पण यांनी स्वतःचाच विकास केला. आमदार लहामटे यांची सिलवासाला कंपनी असल्याचा आरोपही यावेळी रोहित पवारांनी केला.
जर हीच कंपनी या मतदारसंघात सुरू झाली असती तर येथील तरुणांना रोजगार मिळाला असता. आता हे एमआयडीसीच्या नावाखाली स्वतःच्याच कंपन्या टाकणार आहेत. 50 एकर जमीनीत साधं एक गुऱ्हाळ देखील उभे राहत नाही मात्र हे एमआयडीसी उभे करण्याची खोटे आश्वासन देत आहेत. ही सर्वसामान्य जनतेची फसवणूक आहे.
दरम्यान महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे जर विजयी झालेत तर येथे शंभर एकरात एमआयडीसी उभी करून देतो असे आश्वासन देखील यावेळी रोहित पवारांनी दिले. लोकसभा निवडणुकीला महायुतीचे किती हाल झालेत हे साऱ्यांनी पाहिले. आता राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार.
ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे असे विधान रोहित पवारांनी केले आहे. आपल्या भाषणात रोहित पवारांनी महाराष्ट्रात ईडी, सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणाचा गैरवापर होत असल्याचे म्हटले असून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप केला आहे. सध्या राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि गद्दारी आपण पाहत आहोत.
नको त्या ठिकाणी सरकारी तिजोरीचा गैरवापर होताना पाहतोय. जाहिरातबाजीवर अतिरिक्त खर्च केला जातोय. फक्त घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मला गृहमंत्री केले तर एकनाथ शिंदे, अजित दादा आणि भारतीय जनता पक्षातील 70 टक्के नेते गुवाहाटीला पळून जातील असे मिश्किल भाष्य रोहित पवारांनी केले आहे.