शिवसेनेचे निवडणूक चिन्हाबाबत धनुष्यबाणाबाबत अनिल परबांचे मोठे वक्तव्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई :  राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यावरुन शिवसेनेतील अंतर्गत वाद आता न्यायालयामध्ये पोहचला आहे. सध्या शिवसेनेत निवडणूक चिन्हाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असताना शिवसेना नेते अ‌ॅड. अनिल परब यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिलेल्या निर्देशानंतर अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाकडेही जाणार नाही. याबाबतची लढाई आता निवडणूक आयोगाकडे होईल. मात्र त्यासाठी अजून बराच वेळ आहे, असे अनिल परब म्हणाले आहेत. विधीमंडळ सचिवालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यानुसार, नवीन अध्यक्षांची निवड झाली आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निर्णय ते घेतील. त्यामुळे याचिका निकाली काढावी असे म्हटले होते. सध्याचे विधानसभा अध्यक्ष भाजपचे आहेत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, असेही अनिल परब म्हणाले आहेत.

आमच्या सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका प्रलंबित आहेत, त्यावर निर्णय येईपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी घेऊ नये अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिकांवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणताही आदेश न देण्यास सांगितले आहे. आम्ही दाखल केलेल्या याचिकांमधील सगळे मुद्दे सर्वोच्च न्यायालयात येतील. शिवसेनेच्या सर्व याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर अपात्रतेवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.