अनुराधा नागवडे यांनी आमदारकीची तयारी सुरू करावी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती.

त्यांनी या सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांची धूळधाण उडवली. या विजयाने मात्र नागवडे गटाला नवसंजीवनी मिळाली आहे. आता अनुराधा नागवडे यांनी आमदारकीची तयारी सुरू करावी, अशी सुप्त प्रतिक्रिया कारखान्याच्या निकालानंतर उमटत आहे.

गेली ४० वर्षे श्रीगोंदे तालुक्यात आमदार बबनराव पाचपुते व दिवंगत नेते माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या गटातील तो संघर्ष अजरामर राहिला. पाचपुते-नागवडे यांनी अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत एकमेकांशी दोन हात केले. २०१७ मध्ये शिवाजीबापू यांचे निधन झाले.

त्या नंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र राजेंद्र यांनी अनपेक्षितपणे पाचपुते यांचे काम केले. त्यात पाचपुते निवडून आले. विधानसभा निवडणुकीत मदत करताना राजेंद्र नागवडे यांनी पाचपुते यांच्याकडून नागवडे कारखान्यात मदत करण्याचा शब्द घेतला होता. तो शब्द पाचपुते व सदाशिव पाचपुते यांनी नागवडे यांना दिला होता.

पण दुर्दैवाने सदाशिव पाचपुते यांचे निधन झाले व काहीच महिन्यांनी कारखान्याची निवडणूक लागली. शिवाजीबापू यांचे कट्टर समर्थक असलेले केशव मगर यांनी बंडाचे निशाण फडकवत राजेंद्र नागवडे यांना आव्हान दिले.

स्वकीय असलेल्या मगर यांच्या आव्हानाने नागवडे हतबल झालेले पाहायला मिळत होते. अनेक दिग्गज निवडणुकीत उभे असल्याने वातावरण तापले होते. पण मतदानाच्या २ दिवस आधी दीपक नागवडे, आदेश नागवडे यांनी सूत्रे हाती घेत वातावरणच बदलून टाकले.

राजेंद्र यांच्यामागे अनुराधा नागवडे यांनी ग्राऊंड लेव्हलवर जाऊन साखरपेरणी केली. झोकून देऊन प्रचार यंत्रणा चालवली. डॉ. प्रतिभा पाचपुते यांनी राजेंद्र नागवडे यांना वारंवार डिवचण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला.

अनुराधा नागवडे यांनी मुद्देसूद बोलत डॉ. प्रतिभा यांना जशाच तसे उत्तर दिले. त्याचा खुलासा करण्याची वेळ डॉ. प्रतिभा पाचपुतेंवर आली आणि नंतर त्यांना सावध पवित्राही घ्यावा लागला.