अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात साखर सम्राटांचे आजवर वर्चस्व दिसले. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे असतील किंवा आ.आशुतोष काळे-माजी आ. स्नेहलता कोल्हे असतील यांचे उत्तरेत राजकीय वर्चस्व राहिले.
परंतु यांच्यात मात्र कधी सख्य दिसले नाही. बऱ्याच वर्षे एकाच पक्षात असूनही थोरात-विखे यांचा राजकीय संघर्ष कायम तेवत राहिला. तर काळे-कोल्हे यांचा देखील राजकीय संघर्ष सर्वश्रुत राहिला. तसेच विखे-कोल्हे हा राजकीय संघर्ष देखील आहेच.
पुन्हा एकदा विखे-कोल्हे संघर्ष
हे दोन्ही कुटुंब पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकण्याच्या तयारीत आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी कोपरगाव येथील संजिवनी उद्योग समुहाचे प्रमुख पदाधिकारी असलेले विवेक कोल्हे यांच्या पाठोपाठ आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे यांनीही उडी घेतल्याने पुन्हा एकदा विखे-कोल्हे असा सामना रंगणार का, याकडे राजकीय मुत्सद्द्यांचे लक्ष लागले आहे.
आ. काळे यांनाही बसणार संघर्षाची झळ
कोपरगावचे विद्यामान आमदार आशुतोष काळे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात सहभागी झाल्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने कोपरगावचा तिढा सुटल्याचे मानले जात होते.
म्हणजेच काळे कोल्हे यांचा नेहमीच समोर येणारा राजकीय संघर्ष या निमित्ताने समाप्तीकडे चालला आहे असे वाटत होते. मात्र, आता मधेच डॉ. विखेंनीही शड्डू ठोकल्याने मागील वर्षभरापासून रंगत असलेला कोल्हे-विखे वाद पुन्हा नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे.
यातील जय परायज पुढील गणिते ठरवणार असल्याने जर यामध्ये कोल्हे यांचा विजय झाला तर विषयच राहत नाही पण जर पराजय झाला तर पुन्हा एकदा विधानसभेला काळे कोल्हे राजकीय संघर्ष पेटेल यात शंका नाही.
फडणवीस यांची कसरत
विखे आणि कोल्हे हे दोन्ही कुटुंब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात कोणाला बसवायचे आणि कोणाला रिंगणात उतरवायचे हे जसे फडणवीस यांच्यासाठी आव्हान असेल, तसेच जे कोणी बसेल त्यांना दुसऱ्यासाठी कामाला लावणे ही मोठी कसरत असणार आहे.
कोल्हे यांच्या मनी पराभवाची सल
जूननंतर कोणत्याही क्षणी ही निवडणूक जाहीर होऊ शकते. कोल्हे हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि संजिवनी उद्योग समुहाचे चेअरमन विपीनदादा कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. विधानसभा निवडणुकीत आपला पराभव विखे यांच्यामुळेच झाला असा आरोप कोल्हे यांनी वारंवार केला असून ही सल कोल्हे कुटुंबाला अजूनही आहे. त्याचा वचपा म्हणून गणेश सहकारी साखर कारखान्यातील विखे यांची सत्ता विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना सोबत घेत संपुष्टात आणली. त्यामुळे विखे विरूद्ध कोल्हे हा भाजपमधील संघर्ष जिल्हा अनुभवत आहे.