Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षाचे चिन्ह आणि अधिकार मिळाले, त्याचा साधा जल्लोषही आमदार आशुतोष काळे यांनी केला नाही, याचा अर्थ ते त्यांची राजकीय अस्वस्थता लपवत आहेत.
तेव्हा कोल्हे यांच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नये, असा टोला भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी लगावला आहे.
याबाबत पत्रकात पाचोरे यांनी म्हटले, की कोल्हे यांना राजकीय अस्तित्वाची चिंता पडली, असे आशुतोष काळे म्हणाले, आम्ही भाजपा सोडलेली नाही. त्यामुळे आमच्या निवडून येण्याची चिंता तुम्ही करू नये.
कोपरगाव तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांचे प्रलंबित प्रश्न रखडले असल्याने तीव्र असंतोष नागरिकांनी व्यक्त केला होता.
यावेळी आक्रमक भूमिका घेऊन नागरिकांचे प्रश्न संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी मांडल्याने अखेरीस आमदारांना सहा महिने कानाडोळा केलेल्या बैठीकाला हजर राहणे भाग पडले.
आपल्या प्रभावी कार्यशैलीने विवेक कोल्हे यांच्यावर नागरिकांमध्ये कौतुकाचा वर्षाव होतो आहे, त्यामुळे आमदार काळे अस्वस्थ झाले आहेत.
माजी आमदार अशोक काळे यांच्या माध्यमातून कुटुंबाकडे यापूर्वीही सलग दहा वर्षे तालुक्याची सत्ता होती. त्या काळात पाणी घालवले. त्यांनी केवळ जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले.
शहरात अतिक्रमणाचा नांगर फिरवून नागरिकांना विस्थापित केले. पोलीस स्टेशन, पंचायत समिती, वाचनालय, बस स्थानक अशी असंख्य कामे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात झालेली आहेत,
याचा विसर पडला असावा. तेव्हा आयत्या पिठावर रेघा ओढणाऱ्या आमदार काळेंना ४० वर्षे काय केले हे विचारण्याचा अधिकारच नाही.
केंद्राच्या योजनांचे पैसे मीच आणले हे काळे यांचे म्हणणे हास्यास्पद आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांचे लाभार्थ्यांच्या आठ हजार प्रस्तावांचे ७० टक्के काम हे कोल्हे संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे, हे जनताच सांगेल;
परंतु आमदार काळे ते आपणच केल्याचे सांगतात. तीन हजार काय पाच हजार कोटी देखील म्हणायला कमी करणार नाही,
कारण यांना आपला नाकर्तेपना झाकण्यासाठी दुसरा मार्ग उरला नाही, असा आरोप पाचोरे यांनी शेवटी केला आहे.