Bacchu Kadu : प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या मात्र कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू यांची डोकेदुखी वाढली असून बच्चू कडू समर्थकांमध्येही याची चर्चा सुरू आहे. 2017 च्या एका प्रकरणात बच्चू कडू यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा झाली आहे.
याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरु होती. 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते. तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारणे, धमाकवने आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदर बच्चू कडू यांच्यावर होता.
तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1, तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी 1 अशी 2 वर्षांची शिक्षा आहे.
२०१७ साली अपंग लोकांनी नाशिक महापालिका आयुक्तांविरोधात आंदोलन केले होते. अपंगांसाठी असलेला निधी महापालिका आयुक्तांनी खर्च केला नव्हता, असा आरोप त्यांच्यावर होता.
त्यामुळे दिव्यांग लोकांनी नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याविरोधात आंदोलन केलं. पण या आंदोलनाची दखल महापालिका आयुक्तांनी घेतली नाही. त्यामुळे बच्चू कडू अपंगाच्या समस्या घेऊन महापालिका आयुक्तांच्या दालनात गेले.
अपंगाच्या मागण्या मांडत असताना बच्चू कडू आणि महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी बच्चू कडू यांनी आयुक्तांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी २०१७ साली बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.