Balasaheb Thorat News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. लोकसभेचा गुलाल खाली पडत नाही तोवर विधानसभेच्या निवडणुका दारात येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले असल्याचे दिसते.
सध्या जिल्ह्यातील बारा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. अजून महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवारांची घोषणा केलेली नाही मात्र निवडणुकीची इच्छा उराशी बाळगून बसलेले उमेदवार आत्तापासूनच रंगीत तालीम करत आहेत.
तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र आहे. खरे तर महाविकास आघाडीने अजून उमेदवारांची घोषणा केलेली नाही.
परंतु संगमनेर मधून सलग आठ वेळा विजयाचा गुलाल उधळणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेच निवडणुकीत उभे राहतील हे स्पष्ट आहे. मात्र थोरात यांच्या विरोधात कोण उभे राहणार हे अजून समजलेले नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून थोरात यांना नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील आव्हान देणार अशा चर्चा सुरू आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत सुजय विखे यांच्या पराभवामागे बाळासाहेब थोरात यांचा हात होता. म्हणून याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुजय विखे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात दंड थोपटणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
चर्चांना उधान येण्याचे कारण असे की थोरात यांच्या गावात जाऊन सुजय विखे पाटील यांनी, 35 वर्ष त्यांना दिलीत आता फक्त पाच वर्ष मला द्या असे विधान केले होते. यामुळे सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहे, तो जो निर्णय घेणार त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू अशी प्रतिक्रिया देत त्यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षरीत्या मंजुरी दिलेली आहे. अशातच आता बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांच्या संभाव्य उमेदवारी बाबत बोलताना एक मोठे विधान केले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंऐवजी त्यांचे पिताश्री महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर मधून उभे राहावे असे म्हणत विखे पाटील यांना आव्हान दिले आहे. तसेच महाराष्ट्रात यावेळी महाविकास आघाडीचे सरकार येणार असे माझे ठाम मत आहे असं म्हणतं महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
एवढेच नाही तर त्यांनी जागावाटपा संदर्भात देखील मोठी माहिती दिली. विजयादशमी अर्थातच दसऱ्यापर्यंत जागावाटप पूर्ण होईल अशी माहिती थोरात यांनी यावेळी दिली आहे. यामुळे आता बाळासाहेब थोरात यांच्या आव्हानाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे काय उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.