राजकारण

Beed Loksabha : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार ठरला? ‘हा’ नेता करतोय तयारी…

Published by
Ahmednagarlive24 Office

Beed Loksabha : सध्या सर्वच पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. असे असताना बीड लोकसभा मतदार संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित याची वाटचाल लोकसभा निवडणुकीच्या दिशेने असल्याचे सांगितले जात आहे.

ते सध्या गेवराई मतदार संघात सर्वाधिक वेळ देत असले तरी कधी अंबाजोगाई, कधी आष्टी, पाटोदा असा त्यांचा जिल्हाभरातील त्यांचा वावर वाढला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे पुढील उमेदवार तेच असतील असे म्हटले जात आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.

अमरसिंह पंडित नेहमीच मराठवाड्यातील शेती व सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही असतात. बीडला आल्यानंतर शरद पवारांचा राबता पंडितांच्या घरी असतो. पंडित घराण्याला ५० वर्षांचा राजकीय इतिहास आहे.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी अमरसिंह पंडित यांची उमेदवारी ऐनवेळी डावलली गेली. तत्कालीन जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना पक्षाने भाजपच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी दिली. मात्र त्यांचा पराभव झाला.

शेतकरी पुत्र म्हणून सोनवणे वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी ठरले. मात्र, मतांच्या विशिष्ट पल्ल्याच्या पुढे त्यांना मजल मारता आली नाही. पंडित गेवराईचे आमदार व दोनवेळा विधान परिषद सदस्य राहीलेले आहेत. त्यांचे धाकटे बंधू विजयसिंह पंडित जिल्हा परिषद अध्यक्ष राहीलेले आहेत.

सध्या अमरसिंह पंडित मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. अनेक कारखाने त्यांच्याकडे आहेत. संस्थेचे जिल्हाभरातील जाळे व त्यांच्या संस्थांचे जाळे यामुळे निवडणुकीत यंत्रणा राबविणे पंडित यांना सोपे जाईल, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

तसेच त्यांच्या समर्थकांकडून सध्या सोशल मिडीयावर ‘बीड लोकसभा’ असे पेज देखील तयार करण्यात आले आहेत. यामुळे पुढील उमेदवार तेच असतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office