मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. अनेक ठिकाणी हे भाव जवळपास ६० रुपयांपर्यंत गेले आहेत. दिवाळीपर्यंत हा भाव जवळपास ८० रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे. शेतकऱ्यांत जरी समाधानाचे वातावरण असले तरी सर्वसामान्यांचे बजेट मात्र कोसळू लागले आहे.
त्यामुळे आता हे किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठी पावले उचलण्याचे निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता दिल्ली-एनसीआरसह वेगवेगळ्या शहरांमध्ये कांदा हा २५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जाईल असे सरकारने सांगितले.
कांद्याचे सरासरी दर ४७ रुपये किलोपर्यंत वाढल्याचे सरकारने सांगितले. कांद्याच्या वाढत्या किमतींपासून दिलासा देण्यासाठी बफर स्टॉकमधून बाजारात २५ रुपये किलो दराने विक्री वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहक विषयक मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात कांद्याचा सरासरी भाव ४७ रुपये प्रति किलो आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कांद्याचे दर ३० रुपये किलो होते.
रोहित कुमार सिंह (सचिव, ग्राहक विषयक विभाग, केंद्र ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ऑगस्टपासून बफर स्टॉकमधून कांदा देत आहोत. परंतु सध्या किमतीमधील झालेली वाढ रोखण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ विक्री वाढवत आहोत.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ज्या राज्यांमध्ये किमतीत वाढ होत आहे तिथे घावूक आणि किरकोळ दोन्ही बाजारांमध्ये बफर स्टॉकमधून कांदा दिला जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून विविध ठिकाणी बफर स्टॉकमधून सुमारे १.७ लाख टन कांदा देण्यात आल आहे.
तसेच त्यांनी सांगितलं आहे की, किरकोळ बाजारात एनसीसीएफ आणि नाफेड या दोन सहकारी संस्थांच्या दुकानांमध्ये व वाहनांमध्ये बफर स्टॉकमधील कांदा २५ रुपये प्रतिकिलो सवलतीच्या दराने विकला जात आहे.
शेतकरी नाराज होण्याची शक्यता
भाव वाढल्याने शेतकरी समाधानी आहे. कुठेतरी कोलमडले आर्थिक गणित पुन्हा जुळणार होते. ऐन दिवाळीत भाव भेटल्याने अनेकांच्या आर्थिक गरज पूर्ण होतील. परंतु आता जर शासनाच्या धोरणानुसार जर भाव कमी तर शेतकरी वर्गात मात्र नाराजी पसरू शकते.