Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाने ‘चारशे’ पार चा संकल्प केला असून त्याचाच भाग म्हणून भाजपने ‘गाव चलो’ अभियान हाती घेतले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी एक दिवस गावामध्ये मुक्काम करणार आहेत.
नगर दक्षिणेचे खा.डॉ. सुजय विखे वाळकीत मुक्काम ठोकणार असून यादरम्यान ते जनतेशी संवाद साधणार आहेत.भाजपकडून पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी गाव चलो अभियान राबविण्यात येत असून या अभियानात केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजना सर्वसामन्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
नमो अॅपच्या माध्यमातून नागरिकांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोडण्याचा प्रयत करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून पक्षाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते एक दिवस गावामध्ये मुक्कामी जाऊन त्या गावातील नागरीकांशी संवाद साधणार आहेत.
दि. ४ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान नगर दक्षिण मधील ८ तालुक्यात ७०० गावे, वाडी, वस्ती, तांडे व १७३७ बूथवर जावून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेले कामे तसेच नागरिकांच्या अडीअडचणी बाबत संवाद साधणार आहेत.
या अभियानात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजीमंत्री राम शिंदे, खा. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, आ.बबनराव पाचपुते, आ. मोनिकाताई राजळे यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,
मोर्चा आघाडीचे सर्व पदाधिकारी सुपर वारीअर्स, बूथ प्रमुखांची टीम सहभागी होणार आहे. या अभियानांतर्गत १० ते १५ हजार कार्यकर्ते गाव चलो अभियानामध्ये प्रत्येक गाव,
वस्ती, तांडे या ठिकाणी २४ तास गावात निवासी राहणार आहेत आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग घेणार आहेत.
त्यानुसार खा. डॉ. सुजय विखे हे वाळकीमध्ये मुक्काम ठोकणार असून, आ.प्रा. राम शिंदे कर्जत, आ. मोनिका राजळे पाथर्डीत,
जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले राहुरीत तर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग चिंचोडी पाटील या गावात मुक्काम करून जनतेशी संवाद साधणार आहेत.