राजकीय नेत्यांकडून कार्यक्रमांचा धडाका ! लोकसभा निवडणूक पुढे करून खरी तयारी विधानसभेचीच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : लोकसभेची पूर्व तयारी सुरू असताना महायुती व ‘महाविकास आघाडीकडून राजकीय कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. लोकसभा निवडणूक समोर असली तरी खरी तयारी विधानसभेची सुरू आहे.

आमदार मोनिका राजळे, अँड. प्रतापराव ढाकणे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सार्वजनिक कार्यक्रम घेत व जाहीर बोलून आम्ही विधानसभेच्या रिंगणात असल्याचे सुचित केले आहे.

दिलीपराव खेडकर, गोकुळभाऊ दौंड, किसनराव चव्हाण, नितीनराव काकडे, अरुणराव मुंडे, हर्षदाताई काकडे यांच्यापैकीही एखादा उमेदवार ऐनवेळी उमेदवारी करू शकतात. अँड. प्रतापराव ढाकणे यांचा गेल्या पस्तीस वर्षांचा राजकीय संघर्ष सुरू आहे.

गेल्या वर्षभरात ढाकणे यांनी शेवगाव -पाथर्डीत जो संपर्क वाढविला. लोकांच्या सुखदुःखात जाऊन जनतेचे, सुशिक्षित बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्‍न समजावून घेऊन ते सोडविण्यासाठीची धडपड केली असून,

मी कुस्तीसाठी रिंगणात असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. शेवगावमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी बूथ कमिट्यांच्या बैठकीत आपला पक्ष घुले आणि आता लढायचे थांबायचे नाही, मी उमेदवार असणार, असे जाहीरपणे सांगितले आहे.

गेल्या वर्षभरापासून घुले बंधू शेवगाव तालुक्‍यात संपर्क वाढवत होते, परंतू ते जाहीरपणे बोलत नव्हते. आता पाथर्डीतपण येणार व विधानसभेची तयारी करणार, असे घुलेंनी जाहीर केले आहे.

आमदार मोनिकाताई राजळे यांनी गेली पाच वर्षे विकासाची कामेही केली असून, महायुतीचे सरकार आल्यानंतर राजळेंनी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. रस्ते, भगवानगड प्रादेशिक पाणी योजना, शेवगाव व पाथर्डी शहर स्वतंत्र पाणीयोजना, राष्ट्रीय पेयजल योजना, बंधारे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, अशा विविध योजनांतून शेतकऱयांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केला आहे.

कोणावरही थेट टीका न करता विकासकामे करीत रहायचे व संपर्क वाढवायचा ही राजळेंची जमेची बाजू. दिलीपराव खेडकर यांच्या रुपाने तालुक्‍यात ओबीसी नेतृत्व तयार होत आहे. नगरच्या ओबीसी मोर्चाला तालुक्‍यातून मोठी फौज उभी करून त्यांनी काम केले आहे. ते ऐनवेळी विधानसभा निवडणुकीत उडी घेऊ शकतात, असा

त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. गोकुळभाऊ दौंड यांनी राजळे, ढाकणे व घुले यांना एकाचवेळी टीका करुन तालुक्‍याच्या राजकारणात मीदेखील विधानसभा लढवू शकतो, असे जाहीर केलेले आहे.

दौंड यांच्या पत्नी सुनिताताई दौंड पंचायत समितीच्या सभापती राहिलेल्या आहेत. भालगाव ‘व कासारपिंपळगाव गटात दौंड यांनी चांगला जनसंपर्क वाढविलेला आहे. हर्षदाताई काकडे यांनीदेखील पाच वेळा वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटात निवडून येत शेवगावमध्ये चमत्कार केला आहे.

त्यांना वडील व सासरे दोघांचा राजकीय वारसा लाभलेला आहे. अरुण मुंडे, नितीन काकडे, वंचितचे किसनराव चव्हाण यांनीदेखील संघर्षतातून कार्यकर्त्यांचा संच जमवला आहे. तेदेखील विधानसभेला रिंगणात उतरतील, अशी चर्चा सुरू आहे. राजकारणात कधीही व काहीही होऊ शकते. लोकसभा निवडणूक पुढे करून खरी तयारी विधानसभेचीच सरू आहे.