शिर्डी साई मंदिर परिसरातील समाधींवर जमा होणाऱ्या पैशांच्या व्यवस्थापनावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी अब्दुलबाबा समाधीवरील जमा होणारा पैसा खाजगी लोक घरी नेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे सांगून, हा पैसा थेट सरकारकडे जमा व्हावा, अशी मागणी केली आहे.
समाधींचा वाद पेटणार ?
साई मंदिर परिसरात साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या समाधी आहेत. या समाधींवर जमा होणारा पैसा साई संस्थानकडे जमा होतो. मात्र, अब्दुलबाबा समाधीवरील उत्पन्न त्यांच्या वंशजांकडे जात असल्याचे जगताप यांनी उघड केले आहे. हा प्रकार अन्यायकारक असून, सर्व उत्पन्न सरकारकडे जमा व्हावे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शिर्डी परिसरात वादाचा नवीन मुद्दा
अब्दुलबाबा समाधीवरील उत्पन्न आणि साई संस्थानच्या व्यवस्थापनावर झालेल्या या आरोपांमुळे शिर्डी परिसरात वादाचा नवीन मुद्दा निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारकडून या प्रकरणावर कारवाई होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
साई संस्थानच्या भोजनालयावरही वाद
याआधी, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानच्या मोफत भोजन व्यवस्थेवर आक्षेप घेतला होता. “मोफत जेवण बंद करून 25 रुपये शुल्क घ्या आणि या पैशाचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करा,” अशी त्यांनी मागणी केली होती. या वक्तव्यावरून मोठा वाद झाला होता. मात्र, “आपल्या वक्तव्याशी आपण ठाम आहोत,” असा खुलासा त्यांनी केला. त्यांनी शिर्डीतील शिक्षण व्यवस्थेवरही टीका केली होती.