राजकारण

सध्या आमचे ‘वेट अॅण्ड वॉच’- संजय राऊत ; सूचक वक्तव्याने नव्या तर्कवितर्काना सुरुवात !

Published by
Sushant Kulkarni

३१ जानेवारी २०२५ मुंबई : भाजपमध्ये हल्ली हौशे-नवशे आणि गौशे खूप आले आहेत. त्यांचा भाजपशी आणि हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांना शिवसेना-भाजप युतीचे महत्त्व कळणार नाही. पण जुन्या नेत्यापैकी भाजपचे चंद्रकांत पाटील हे शिवसेना-भाजप युतीचे समर्थक होते.आम्ही २५ वर्षे एकत्र काम केले आहे, असे सांगत आम्ही सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत,अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे (ठाकरे) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी दिली.राऊत यांनी केलेल्या या विधानाचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यानिमित्त पाटील आणि शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली.त्यावेळी पाटील आणि ठाकरे यांच्यात गप्पा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.अशातच ‘शिवसेना-भाजपची पुन्हा युती झाल्यास तो माझ्यासाठी सुवर्णक्षण असेल,’ असे पाटील हे ठाकरे यांना म्हणाल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे एकमेकांपासून दूर गेलेले हे दोन्ही पक्ष जवळ येणार का ? असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला.

त्याबाबत राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, देशाच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप युतीचा एक सुवर्णकाळ होता.आमच्यामुळेच देशाच्या राजकारणात आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह दिसत आहेत.शिवसेना सोबत आल्यानेच भाजपचा अमृतकाळ सुरू झाला. पाटील सुरुवातीपासूनच शिवसेना-भाजप युतीचे समर्थक आहेत. ते आमचे चांगले मित्रही आहेत. शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रही असणारी जी जुनी पिढी होती, त्यात चंद्रकांतदादांसारखे नेते होते.

पाटील यांच्याप्रमाणेच त्या पक्षामध्ये अनेकांच्या भावना आहेत; शिवसेना नेत्यांच्याही मनात असू शकतात. २५ वर्षे एकत्र असलेल्या महायुतीत अमित शाह यांनी वितुष्ट निर्माण केले.पाटील यांना सुवर्णकाळ वाटत असला, तरी शिवसेना-भाजप युती झाल्यास तुमच्यासाठीही तो सुवर्णक्षण असेल का? असा प्रश्न राऊत यांना विचारताच ते म्हणाले, याचे उत्तर मी आता देऊ शकत नाही.योग्य वेळी उत्तर देईन. पुढे कोणत्या घडामोडी घडणार आहेत, काय घडणार आहे, याची पूर्ण कल्पना असल्याने सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत.

शिवसेनेप्रमाणे शिंदे गटही फोडणार

शिंदे गट भाजपसोबत किती काळ राहील ? तो किती काळ टिकेल? याबद्दल माझ्या मनात शंका आहे. शिवसेनेप्रमाणे त्यांचा गटही फोडला जाईल आणि त्यांचा गट पूर्णपणे विस्कळीत होईल. आज ते सत्ता आणि पैशाच्या जोरावर एकत्र आहेत. बाकी त्यांच्याकडे काहीही नाही, अशी जोरदार टीका राऊत यांनी केली.

शाह यांना शिवसेना फोडायची होती

भाजपच्या काही लोकांच्या हट्टामुळे आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो. २५ वर्षांची युती ज्या कारणांमुळे तुटली, ती पाहिली तर आमची भूमिका योग्य होती, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. आम्ही जे मागत होतो, ते आमचा पक्ष फोडल्यावर आमचा जो हक्क आणि दावा होता, तो एकनाथ शिंदेंना दिला.आता त्या सरकारमध्ये डुप्लिकेट शिवसेना आहे.चर्चत ठरलेली आमची जी मागणी होती, ती अमित शाहांनी नाकारली.अमित शाह यांना ठरवून बाळासाहेबांची शिवसेना फोडायची होती.त्यांचे मुंबईत आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत.त्यासाठी आजही ते एकनाथ शिंदे यांचा वापर करत आहेत,असा दावा राऊत यांनी केला.

Sushant Kulkarni