२९ जानेवारी २०२ पुणे : मंत्री धनंजय मुंडे यांचे मतदारसंघातील आणि इतर कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत असून, दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत.वाल्मिक कराड फरार होता, तेव्हा त्याने यातच लक्ष दिले,मालमत्ता ट्रान्सफर केल्या आहेत. याबद्दलची माहितीदेखील समोर आली आहे,असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, सरपंच संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध सारखाच आहे. त्यांनी अनेक खून पचवले आहे. दोघे सावलीसारखे सोबत असताना, निर्लज्जासारखे हे सरकार मुंडे यांना सत्तेत ठेवत आहे.
सरकार केवळ तपासाचे नाटक करत असून, ते मुंडे यांना पाठीशी घालत आहे. कराड याच्या अनेक मालमत्ता विविध ठिकाणी मिळून आल्या आहेत. कोट्यवधींचे व्यवहार समोर आले आहेत. अशावेळी ईडी, आयकर विभाग झोपले आहे का? असा संतप्त सवाल करत बीड जिल्ह्यात पोलीस, तहसीलदार मुक्तपणे काम करू शकत नाहीत. त्यांच्यावर दबाव आहे. त्यांना मारहाण, शिवीगाळ केली जाते.
कराड आणि मुंडे यांचेबगलबच्चे सातत्याने दबाव निर्माण करत असतात, असा आरोप दानवे यांनी केला.दोन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एसटी नफ्यात असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर एक हजार ३१० खासगी बसेस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता.
यात दोन हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार असल्याचे मी पुराव्यानिशी विधिमंडळात मांडले होते. त्यानंतर समिती नेमून हे टेंडर रद्द करण्यात आले. एकीकडे महामंडळात दोन हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार करण्यासाठी लोक टपलेले असताना, दुसरीकडे १५ टक्के भाडेवाढ करण्यासंदर्भातील निर्णय कशासाठी घेण्यात आला ? खासगी बससेवांना प्राधान्य देऊन राज्य सरकारला एसटी महामंडळाला खासगीकरणाला वाव द्यायचा आहे का? अशा शब्दात दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला.