Shirdi News : शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा करत अजित पवारांना पक्षातून बाहेर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा दावा केला. पक्षफुटीनंतर भरवलेल्या या पहिल्या अधिवेशनात मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीपासून बीडमधील परिस्थितीवर भाष्य करत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.
अजित पवारांना शपथविधीला जाऊ नये, अशी विनंती केली होती
धनंजय मुंडे यांनी सांगितले की, पहाटेच्या शपथविधीच्या आधीच अजित पवारांना पक्षातून दूर करण्याचे डावपेच सुरू होते. “मी दादांना हात जोडून विनंती केली होती की तुम्ही शपथविधीला जाऊ नका, हे मोठे षडयंत्र आहे. मात्र, त्यांनी माझे न ऐकता शपथविधी घेतला,” असे त्यांनी सांगितले. या घटनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साक्षीदार असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य करताना मुंडे म्हणाले, “ज्यांनी हा अमानुष गुन्हा केला, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.” यासोबतच विरोधकांवर टीका करत त्यांनी, “मी वेळ आल्यावर योग्य उत्तर देईन. मात्र, माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका,” अशी कळकळीची विनंती केली.
बीडच्या पालकमंत्रीपदामागची इनसाईड स्टोरी
बीडच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या तर्कवितर्कांवर धनंजय मुंडेंनी यावेळी खुलासा केला. त्यांनी सांगितले की, “बीडचा विकास होण्यासाठी दादांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी माझी विनंती होती. जसा पुण्याचा विकास झाला, तसा बीडचा व्हावा, ही माझी भावना होती.”
विरोधकांचे आरोप फेटाळले
आर्थिक हितसंबंधांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाले, “वाल्मिक कराड यांच्याशी माझे कोणतेही आर्थिक संबंध नाहीत. विरोधकांनी केलेले आरोप खोटे आहेत.” त्यांनी विरोधकांना एका तरी आरोपाचा पुरावा सादर करण्याचे आव्हान दिले.
सामाजिक सलोख्याचे आवाहन
बीडमधील सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करत धनंजय मुंडेंनी जिल्ह्यातील राजकारणातील कट-कारस्थानांना उत्तर देण्याची तयारी दर्शवली. “माझ्या विरोधकांनी मला बदनाम करायचे ठरवले आहे, पण बीड जिल्ह्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही,” असे ठामपणे सांगून त्यांनी विरोधकांना इशारा दिला.