सध्या राजकारणात व राजकीय नेत्यांच्या बाबतीत ईडी ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे. ज्याप्रमाणे अनेक नेत्यांच्या मागे ईडीने चौकशीचा फेरा लावला, आता या फेऱ्यात रोहित पवार हे देखील अडकले आहेत. चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे.
नुकतीच त्यांची १२ तास ईडीने चौकशी केली. आता पुन्हा फेब्रुवारीत त्यांची ईडीची चौकशी होणार आहे. परंतु या ईडीच्या चौकशीने आ. रोहित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला कलंक न लागता उलट त्याचा त्यांना राजकीय फायदा झाला आहे का?
हे पाहणे खरे गरजेचे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील चौकशी करण्याचा प्रयत्न ईडीने केला होता. पण उलट शरद पवार यांनीच ईडीला घाम फोडला. त्यामुळे त्यांना राजकीय फायदा जास्त झाला होता. त्यामुळे आता ईडीची चौकशी शरद पवारांना जशी फायदेशीर ठरली तशी रोहित पवारांनाही वरदान ठरेल असे दिसत आहे.
आ. रोहित पवार – समंजस, धीरगंभीर तरुण राजकारणी..
साधारण आठ वर्षांपूर्वी राजकारणात आलेले शरद पवार यांचे नातू राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार हे सध्या लोकप्रिय राजकारण्यांपैकी एक आहेत. तरुणवर्ग त्यांचा मोठा फॅन असलेला दिसतो. तसेच ते समंजस, धीरगंभीर तरुण राजकारणी म्हणून परिचित आहेत. आता याची प्रचिती जनमानसात करून देण्यात ईडी या तपास यंत्रणेने मोलाची कामगिरी बजावली असेच म्हणावे लागेल.
आ. रोहित पवार यांची ईडीने चौकशी केली त्या दरम्यान तेथे जाताना त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले होते. 12 तास चौकशी झाल्यानंतर बाहेर येऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
तसेच त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सणकून टीका केली व अजित दादांवरही बोचरी टीका केली. एकंदरीतच त्यांचा कार्यकर्ते, पत्रकारांशी संवाद साधण्याची पद्धत यातून राजकीय परिपक्वता दाखवून दिली.
आ. रोहित पवार हेच राष्ट्रवादीतील आगामी ‘दादा’ ?
रोहित पवार हे ईडीच्या चौकशीला जाताना त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड , स्वतः शरद पवार असे मातब्बर नेते होते. अजित पवार यांच्या सारखेच रोहित पवार यांनाही ‘दादा’ या टोपणनावाने ओळखले जाते. आता सध्या शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार असा एक प्रश्न सर्वानाच पडतो.
दरम्यान आ. रोहित पवार यांच्या परिपक्वतेमुळे राष्ट्रवादीतील काही नेते अस्वस्थ झाले होते असे म्हटले जाते व काहींचे वक्तव्य तसे सांगूनही जाते. दरम्यान शरद पवार यांनी कधीही राष्ट्रवादीचे नेतृत्व रोहित पवार करणार असे म्हटलेले नाहीच. परंतु रोहित दादा यांच्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे लोक म्हणतात व ते दाखवून देण्याची संधी ईडीने उपलब्ध करून दिली असं म्हणणे वावगे ठरणार नाही.
याचे कारण असे की चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आणि त्यांच्यासोबत असलेली नेते, कार्यकर्त्यांची गर्दी यातूनच आ. रोहित पवार हेच राष्ट्रवादीतील आगामी ‘दादा’ असतील याचे संकेत मिळाले आहेत. एकंदरीतच ईडीची चौकशी शरद पवारांना जशी फायदेशीर ठरली तशी रोहित पवारांनाही वरदान ठरेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.