अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, केंद्रीय कृषीमूल्य आयोगास स्वायत्तता देणे यासाठी अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत आंदोलन करणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर पोपटराव पवार यांनी गुरुवारी राळेगणसिद्धी (ता.पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बोलताना पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेतच.
आपले आंदोलन शेतकऱ्यांसाठीच आहे. मात्र, वय आणि तब्येतीचा विचार करता आपण उपोषण करू नये, अशी विनंती यांनी केली. मौन आंदोलन हेच योग्य राहील, असे सुचविले.
यावेळी अण्णा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कृषिमंत्र्यांना अनेक पत्रे पाठविली. मागे केलेल्या आंदोलनात लेखी आश्वासन दिले. मात्र, अजूनही त्याची अंमलबजावणी केली नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही.
शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देऊन आत्महत्या करत आहेत. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार शेतमालाला हमीभाव देत नाही याचे दुःख वाटते. त्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे हजारे यांनी सांगितले.