गोदावरीतून जायकवाडी धरणात पाणी सोडू नका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राहाता तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होणार असल्याने जायकवाडीला नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने राहाता तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शेतातील पीक पाण्याअभावी जळत असल्याने शेतकरी हताश झाला. तालुक्यात पाऊस अत्यल्प झाला असून विहीर व कुपनलिकांचे पाणी शेवटच्या घटका मोजत आहे.

या दुष्काळी स्थितीवर डोळेझाक करता येणार नाही. गणेश परिसरात ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत. पिकांना जीवनदान देण्यासाठी गोदावरी कालव्यांचे आवर्तन सोडणे गरजेचे आहे. यामुळे किमान शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

पाऊस न पडल्याने कर्ज काढून शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खते टाकून पेरण्या केल्या. परंतु ऐनवेळी पावसाने पाठ फिरवल्याने डोळ्यासमोर उभी राहिलेली पिके जळताना शेतकऱ्याला पहावे लागले.

यंदा कमी पाऊस झाल्याने शेततळे जलसंधारणातून झालेल्या साठवण तलावातही पाण्याचा संचय झाला नाही. ८ ते १० वर्षांपासून शेतीतून मिळणारी समृद्धीच पाण्याच्या कमतरतेमुळे गायब झाली. फक्त शेतीवरच उदरनिर्वाह असलेल्या कुटुंबाची बिकट अवस्था झाली.

गोदावरी नदीतून यंदा दुष्काळ असताना देखील २१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे गेले. तरीही दारणा व गंगापूर धरण समूहातून तब्बल तीन टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाणार असल्याने दारणा व गंगापूर धरण समूहाला त्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळे या समूहातील शेती आणखी धोक्यात येईल.