मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारुन ४० आमदारांच्या पाठिंबा घेत भाजपसोबत नवे सरकार स्थापन करुन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे अशा दोन गटांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. या दोन्ही गटांचा अगदी वाद सर्वोच्य न्यायालयापर्यंत पोहचला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत राहिलेल्या १५ आमदारांना पत्र पाठवले आहे.
शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेबा ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले, असे उद्धव ठाकरे पत्रामध्ये म्हणाले आहेत.
शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंनी पाठवलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. पक्षप्रमुखांनी शिवसेनेत राहिलेल्या आमदारांचे आभार मानले आणि कौतुकही केले आहे.