Ahmednagar Politics : अशोक कारखाना हि तालुक्याची कामधेनू आहे. ती टिकली तरच तालुक्यातील शेतकरी, कामगार, व्यापारी टिकतील. तेंव्हा ज्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पाप करुन तालुक्याच्या पाण्यावर संक्रांत आणली तसेच निळवंडेचे पाणी आपल्या भागात पळविले,
अशा वरच्या भागातील नेत्यांच्या कारखान्यांना ऊस देवू नका, असे आवाहन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात माजी आमदार मुरकुटे म्हणाले की, वरच्या भागातील नेत्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. सत्तेच्या जोरावर दंडेलशाही करुन ते अशोकच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवित आहेत.
वरच्या नेत्यांनी समन्यायी पाणी वाटपाचा कायदा करुन आपल्या भागाचे संजीवनी असलेल्या भंडारदरा धरणाचे पाणी घालविले. निळवंडेचे ८.५ टी.एम. सी. पाणीही त्यांच्या भागासाठी पळविले.
निळवंडेचा संगमनेर व राहाता या तालुक्यांनाच लाभ आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा व दिघी या दोनच गावांना थोडासा लाभ होणार आहे. तेव्हा ज्यांनी आपल्या भागाचे पाण्याचे तिन तेरा वाजविले. त्यांना साथ देवू नये, असे मुरकुटे म्हणाले.
याबाबत ते पुढे म्हणाले की, अशोक कारखाना जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देतो. ऊसाच्या तोडीत वशिलेबाजी केली जात नाही. अशोक कारखाना हि तालुक्याची एकमेव कामधेनू आहे.
ती स्वतःच्या कारखान्यांना ऊस उपलब्ध व्हावा, या हेतूने सत्तेच्या जोरावर बंद पाडण्याचा वरच्या नेत्यांचा इरादा आहे. तो सफल होवू देवू नये. अशोक कारखान्यावर तालुक्याचे अर्थकारण अवलंबून आहे.
तसेच श्रीरामपूरसह तालुक्यातील बाजारपेठा अशोकमुळे टिकल्या आहेत. हे सर्व ध्यानात घेता तालुक्यातील कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वरच्या भागातील नेत्यांच्या अमिषाला बळी पडून ऊस देवू नये, असे आवाहन मुरकुटे यांनी केले आहे.